अलिबाग: पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी! कुटूंबियांनी मृतदेह नाकारल्याने कोरोनाबाधितावर केले अंत्यसंस्कार
अलिबागमध्ये (Alibag) हे चित्र पाहायला मिळाले.
कोरोना व्हायरससारखे (Coronavirus) महाभयाण संकट महाराष्ट्राभोवती घोंगावत असताना या कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. यामध्ये मृत पावलेल्या कोरोना बाधितांच्या अनेक कुटूंबियांना आपल्या व्यक्तीला बघता आले नाही, ना अंत्यसंस्कार करता आले. तर दुसरीकडे काही मृत कोरोना बाधितांच्या शवांना कुटूंबियांनीच स्विकारले नाही. अशाच एका कोरोनाबाधिताचा मृतदेह त्याच्या कुटूंबियांनी नाकारल्याने पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. अलिबागमध्ये (Alibag) हे चित्र पाहायला मिळाले. माणुसकीचे उत्तम उदाहरण देत पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचाऱ्यांनी या कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले असून अलिबागची ही घटना आहे. महसळा तालुक्यातील दुर्गम डोगराळ भागात असलेल्या केलटे गावातील एका 76 वर्षीय वृद्धाचा 30 एप्रिल रोजी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु घरच्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वीच करोनाच्या जीवघेण्या आजारातून बाहेर आला होता, तो देखील वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुढे आला नाही किंवा कुणी ग्रामस्थांनी देखील याकामी पुढाकार घेतला नाही. अशावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार कुणी करायचे? हा मोठा प्रश्नच होता.हेदेखील वाचा- चिंताजनक! Covid-19 च्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळण्याची शक्यता; CM Uddhav Thackeray यांनी दिले 'हे' निर्देश
यानंतर तहसीलदार शरद गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कर्चे यांनी तातडीने पत्रकार निकेश कोकचा व पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस नाईक सुर्यकांत जाधव, 108 रूग्णवाहिकेचा पायलट शरद नांदगावकर व भरत चव्हाण यांना बोलावून घेतले. या सर्वांना विश्वासात घेवून याबाबतची माहिती दिली. ही सर्व मंडळी गावात पोहोचली आणि तातडीने कामाला लागली . कोणतीही भीती न बाळगता अंगावर पीपीई कीट चढवले आणि मग अंत्यसंस्कार केले. या घटनेवरुन समाजात अजून माणुसकी शिल्लक आहे याची प्रचिती येते.
दरम्यान महाराष्ट्रात मागील 24 तासांत 63,282 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 802 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या 46 लाख 65 हजार 754 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 69,615 वर पोहोचली आहे.