मांडवा – गेटवे फेरी बोट 1 सप्टेंबरपासून सुरू होणार; गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा

गौरी-गणपती निमित्ताने अलिबाग, मुरुड येथे येणाऱ्या गणेशभक्तांना यामुळे दिलासा हा मिळणार आहे.

Ro-Ro Ferry (Photo Credits: M2M Ferries)

मांडवा ते मुंबई दरम्‍यान समुद्रातील फेरी बोट प्रवास सुरु होणार आहे. ही जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मान्सूनमध्ये खवळणाऱ्या समुद्रामुळे ही वाहतूक 26 मे पासून बंद ठेवण्यात आली होती. गौरी-गणपती निमित्ताने अलिबाग, मुरुड येथे येणाऱ्या गणेशभक्तांना यामुळे दिलासा हा मिळणार आहे. पावसाळ्यात बंद असलेली ही सेवा पावसाळा संपत आल्‍यानंतर हवामान आणि समुद्राच्‍या लाटांचा अंदाज घेवून मेरीटाइम बोर्ड ही सेवा सुरू करण्‍याबाबत निर्णय घेत असते.  वाहतुक सुरु झाल्यामुळे मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे.  (हेही वाचा - Ganpati Festival 2024 Special Trains By WR: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍यांना पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणार 6 स्पेशल ट्रेन; इथे पहा संपूर्ण यादी)

आठ महिने मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार पंधरा लाखांच्या आसपास आहे. पावसाळयाच्‍या दिवसात ही सेवा बंद ठेवण्‍यात येत असते. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्‍सव सुरू होत आहे. हा मार्ग खुला होत असल्याने गणेशोत्‍सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्‍यांना दिलासा मिळणार आहे.

मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फेरीबोट सुरु करण्यापूर्वी त्यांची डागडुजी, सुरक्षा साधनांची तपासणी करुन घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी डॉ. सी. जे. पांडे यांनी दिली.