Mumbai Rain: पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, नागरिकांना खबरदारीचे आवाहन
त्यामुळे घराच्या बाहेर पडणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.
सोमवारी मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईत आलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबईसाठी इशारा जारी केला आहे. दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. येत्या तीन ते चार तासांमध्ये ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि रायगडातील काही भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागात जवळपास 40 ते 50 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील. त्याचसोबतच या सर्व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली. (हेही वाचा - Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर दुर्घटनास्थळी नेत्यांचं राजकारण; भाजप आणि मविआचे भावी खासदार भिडले(Watch Video))
आयएमडीने सांगितलंय की, 40-50 किमोमीटर प्रति तास या गतीने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि आकाशात विजा चमकणार आहेत. मुंबई आणि उपनगरातील बंदिस्त भागांमध्ये जोराच्या वाऱ्याचा प्रभाव जास्त पाहायला मिळणार आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरात सोमवारी जोरदार वारे वाहत होते. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 100 च्या पुढे पोहोचला होता. कालच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या होत्या. घाटकोपर परिसरात वेगवान वाऱ्यांमुळे महाकाय होर्डिंग जमीनदोस्त झाले होते. या होर्डिंगच्या खाली अनेकजण दाबले गेले होते. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.