Sameer Wankhede Caste Certificate: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचे अकोला कनेक्शन
या माहितीमध्ये वानखेडे यांचे अकोला (Akola) कनेक्शन पुढे आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई पोलिसांनी माहिती घेतली आहे. या माहितीमध्ये वानखेडे यांचे अकोला (Akola) कनेक्शन पुढे आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्राप्त माहितीनुसा, मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबल समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी तपास आणि माहिती घेण्यासाठी अकोला येथे पोहोचले. अकोला येथील तहसील कार्यालयातून त्यांनी वानखेडे यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली. ही माहिती तहसील विभागाकडून ती प्रामणीतही करुन घेण्यात आल्याचे समजते. अकोल्यातील नोंदीनुसार समीर वानखेडे यांच्या वडीलांच्या नावासमोर अनुसुचीत जातीचा उल्लेख असल्याची माहिती आहे.
क्रूझ पार्टी प्रकरणी समीर वानखेडे जोरदार चर्चेत आले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे ते अधिकच चर्चेत आले. मलिक यांनी केलेले आरोप प्रामुख्याने समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत होते. वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवली हा मलिक यांचा आरोप होता. भारतीय महसूल सेवा ( आयआरएस ) अधिकारी समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये ( एनसीबी ) प्रतिनियुक्तीवर आहेत. या विभागातील त्यांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यामुळे आता ते याच विभागात मुदतवाढ घेून राहणार की प्रतिनियुक्तीवर जाणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Sameer Wankhede: समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपणार, मुंबई NCB ला मिळणार नवा प्रमुख; वाचा सविस्तर)
'मटा'ने दिलेल्या वृत्तानुसार वानखेडे कुटुंबीय हे मुळचे वाशीम जिल्ह्यात असलेल्या रिसोड तालुक्यातील. सुरुवातीला अकोला आणि वाशी हा संयुक्त जिल्हा होता. दरम्यान, 1998 मध्ये हा जिल्हा वेगळा झाला. त्यामुळे आजही वाशीम जिल्ह्यातील काही नागरिकांच्या नोंदी या अकोला येथे आढळून येतात. त्यामुळे वानखेडे यांची कागदपत्रे तपासणीसाठी मुंबई पोलीस अकोला येथे पोहोचले. अकोल्यातील तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांवर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावासमोर अनुसूचित जातीचा उल्लेख आहे. याबाबतची प्रत तहसील कार्यालयाकडून मुंबई पोलिसांनी प्रमाणित करुन घेतल्याचे समजते.