Ajit Pawar Vs Jayant Patil: अजित पवार स्पष्टच बोलले, मग जयंत पाटील काहीसे चिडले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात नेमके काय घडले?
या शक्यता आणि चर्चांना इतके उधाण येण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेली भूमिका.
राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षात नजिकच्या काळात संघटनात्मक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. खास करुन प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खांदेपालट होऊ शकते. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, सध्या राष्ट्रवादीत सुप्त रुपात सुरु असलेला अजित पवार विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष (Ajit Pawar Vs Jayant Patil) आगामी काळात अधिक वाढू शकतो. या शक्यता आणि चर्चांना इतके उधाण येण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेली भूमिका.
अजित पवार काय म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, पक्ष आणि सरकारमध्ये मी विविध पदे भूषवली. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. आताही मी विधानसभेचे विरोधी पक्षनेता पद स्वीकारायला फारसा उत्सुक नव्हतो. पण, मला कार्यकर्त्यांनी आग्रह केला. वरिष्ठांनी आदेश दिला. त्यामुळे मला ते स्वीकारावे लागले. पण, या पदावरुन काम करताना अनेक लोक मला म्हणाले तुम्ही म्हणावे तितके आक्रमक होत नाही. आता काय समोरच्याची गचांडी धरायची का? पण आता मला विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करा. मला संघटनेत काम करायचे आहे. संघटनेत मला कोणतीही जबाबदारी दिली तरी चालेल. अर्थात हा वरिष्ठांचा अधिकार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दरम्यान, आपल्या भाषणात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट कार्यकाळच वाचून दाखवला. यात जयंत पाटील यांनी पाच वर्षे आणि काही महिने काम केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात तीन वर्षांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची पद्धत असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या या मुद्द्यावरुनच अधिक चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Ajit Pawar: मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा; अजित पवारांची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विनंती)
जयंत पाटील चिडले?
अजित पवार यांनी भाषण केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण करण्यास नकार दिल्याचे समजते. मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सूचना केल्यानंतर जयंत पाटील यांनी भाषण केल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळाची वर्षे आणि महिनेही मोजले आणि ते जाहीरपणे सांगितल्याबद्दल जयंत पाटील नाराज झाल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पादाचा राजीनामा देत असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय फिरवला. मात्र, शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीत अनेक घडामोडी घडल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाले. त्यामुळे अजित पवार यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. यावर आता राष्ट्रवादी कसा तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे.