नालासोपारा: पोलिसांसमोर मेव्हण्याची हत्या, बहिणीच्या आत्महत्येने संतापलेल्या भावाचे कृत्य
मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बहिणीच्या आत्महत्येमुळे आपण मेव्हण्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने प्राथमिक चौकशीत दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांसमोरच चाकूने सपासप वार करत मेव्हण्याने मेव्हण्याची ( Brother In Law) हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा पोलीस स्थानकात (Nalasopara Police Station) घडली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा नोंदवला. रवींद्र काळे असे आरोपीचे नाव आहे. बहिणीच्या आत्महत्येने संतप्त झाल्यने आरोपीने हे कृत्य केले. या घटनेत वर्षीय आकाश केळकर (वय-22 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. केळकर हे आरोपीच्या बहिणीचे पती होते. चक्क पोलीस स्थानकातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी रवींद्र काळे याची बहीण कोमल काळे हिचा आणि मृत आकाश केळकर यांनी दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. हा विवाह कोमल हिच्या घरच्यांना फारसा रुचला नव्हता. विवाहानंतर आकाश आणि कोमल हे नालासोपारा येथे आले आणि त्यांनी संसार सुरु केला. दरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन खटके उडत असत. रविवारीही त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून कोमल हिने रविवारी (13 ऑक्टोबर) आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्यावर सोमवारी (14 ऑक्टोबर) अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, नालासोपारा पोलिसांनी कोमल हिच्या आत्महत्येनंतर तिचा पती आकाश केळकर याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले होते. पोलीस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत आकाश याची चौकशी सुरु होती. ही चौकशी सुरु असतानाच रविंद्र काळे हा चाकू घेऊन आला आणि त्याने आकाशवर वार करायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली. (हेही वाचा, आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या)
जखमी आकाश याला पोलिसांनी रिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बहिणीच्या आत्महत्येमुळे आपण मेव्हण्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने प्राथमिक चौकशीत दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.