'एमआयएम'नंतर प्रकाश आंबेडकरांचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध

ओवेसींच्या 'एमआयएम'ने 'वंदे मातरम'च्या सक्तीला यापूर्वीच विरोध दर्शवला आहे.

प्रकाश आंबेडकर (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

राष्ट्रगीत असताना 'वंदे मातरम'चा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची आणि असदूद्दीन ओवेसी यांच्या 'एमआयएम' पक्षाची नुकतीच युती झाली आहे. ओवेसींच्या 'एमआयएम'ने 'वंदे मातरम'च्या सक्तीला यापूर्वीच विरोध दर्शवला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आंबेडकर यांनी उत्तर देताना 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध दर्शवला. ते म्हणाले, वंदे मातरम हे राष्ट्रगीत नाही. त्यामुळे त्याबाबत कोणावर सक्ती करता येणार नाही. करता कामा नये. तसेच, 'जन गन मन' हे अधिकृत राष्ट्रगीत आहे. मग आणखी पर्यायी गीत कशासाठी हवे? भाजपचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही काय? असा सवाल विचारत आंबेडकर यांनी 'वंदे मातरम'च्या सक्तीला 'एमआयएम'च नव्हे तर, आमचाही विरोध असल्याचे सांगितले. (हेही वाचा, मुंबई: फेसबुकवरील पोस्टच्या वादातून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात)

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नालाही आंबेडकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेसला आमच्यासोबत मैत्री करायची असती तर, आतापर्यंत काहीतरी हालचाल दिसली असती. पण, गेली दोन महिने काँग्रेसकडून काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे याचा अर्थ असा निघतो की, काँग्रेसला मी आणि वंचित बहुजन चालत नाहीत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीसोबत असलेल्या धनगर समाजाला रष्ट्रवादीची साथ नको आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करायला आमचा नकार आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच, २०१९मध्ये लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत, असेही आंबेडकर यांनी या वेळी जाहीर केले.