Afghan Diplomat Caught Smuggling Gold: सोने तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडली गेली अफगाणिस्तानची महिला राजनैतिक; दुबईहून आणला होता कोट्यावधी रुपयांचा माल
अशा परिस्थितीत डीआरआयने आधीच आपले अनेक अधिकारी मुंबई विमानतळावर तैनात केले होते. झाकिया वारदक मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला आणि तिच्या मुलाला थांबवले.
Afghan Diplomat Caught Smuggling Gold: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सोने तस्करीबाबतचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. या ठिकाणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) अफगाणिस्तानच्या एका महिला राजनैतिकाला (Afghan Diplomat) मुंबई विमानतळावरून सोन्याची तस्करी करताना पकडले आहे. महिला मुत्सद्दीकडून 25 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या तस्करीच्या सोन्याची किंमत 18.6 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला राजनयिकाचे नाव झाकिया वारदक (Zakia Wardak) असे आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 25 एप्रिल रोजी डीआरआयने या अफगाण महिला डिप्लोमॅटकडून 25 किलो सोने जप्त केले. हे प्रकरण आत्ता समोर आले आहे. अहवालानुसार, अफगाणिस्तानची डिप्लोमॅट झाकिया वारदक 25 एप्रिल रोजी आपल्या मुलासह दुबईहून मुंबई विमानतळावर पोहोचली.
ती मुंबईत पोहोचण्यापूर्वीच डीआरआय अधिकाऱ्यांना ती सोन्याची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. अशा परिस्थितीत डीआरआयने आधीच आपले अनेक अधिकारी मुंबई विमानतळावर तैनात केले होते. झाकिया वारदक मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला आणि तिच्या मुलाला थांबवले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला, कस्टम ड्युटी लागू होईल असा काही माल तिच्याकडे आहे का? अशी विचारणा केली. त्यावर वारदकने ‘नाही’ असे उत्तर दिले. (हेही वाचा: Share Market Opening: शेअर बाजाराच्या निर्देशंकाची 75 हजाराच्या आकड्याला गवसणी; निफ्टीही नवीन विक्रमी उच्चांकावर)
मात्र त्यानंतर जेव्हा तिची कसून तपासणी केली गेली तेव्हा, तिचे जॅकेट, लेगिंग्ज आदीमध्ये सोन्याचे बार आढळून आले. झडतीमध्ये तिच्या मुलाकडे काहीही मिळाले नाही. त्यानंतर तिला या सोन्याचा कायदेशीर ताबा सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते, परंतु ती ते देऊ शकली नाही. नंतर डीआरआयने हे सोने जप्त केले. सध्या तरी झाकिया वारदकला अटक करण्यात आली नाही, परंतु तिच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सोन्याच्या तस्करीच्या आरोपांनी घेरल्यानंतर अफगाण डिप्लोमॅट झाकिया वारदकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.