Ashadhi Wari 2024: टाळ-मृदुंगाच्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरींचा समावेश

संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे 55 वे वर्षे आहे. पालखीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरींचा समावेश आहे.

Photo Credit - X

Ashadhi Wari 2024: सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे 55 वे वर्षे आहे. जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले. श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे पहाटे लवकर विधिवत पूजन करून श्रींच्या सेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली. आज पालखी प्रस्थान सोहळ्याला नवं नियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित आहेत. (हेही वाचा:Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2024: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारी साठी 29 जूनला प्रस्थान )

टाळ-मृदूंगाच्या गजरात... जय गजानन श्री गजानन.. विविध अभंगांच्या निनादात शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी 250 टाळकरी 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन सहभागी झाला आहे. पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे विठूरायाच्या चरणी दाखल होणार आहे. आषाढी सोहळा संपल्यावर पालखी 21 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून 11 ऑगस्ट रोजी शेगावात पोहोचेल. एकूणच राज्यभरातील वारकऱ्यांचा आनंद आणि उत्साह या पाहायला मिळत आहे.(हेही वाचा: Ashadhi Wari 2024 MSRTC Special Bus Service: आषाढी वारी निमित्त एमएसआरटीसी विशेष बस सेवा; घ्या जाणून)

आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी 29 जूनला प्रस्थान होणार आहे. पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी 21 जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल. यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले आहेत. आषाढी एकादशी 17 जुलैला आहे. या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो. संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये येतात.