पुणे: अनधिकृत होर्डिंग कोसळून २ ठार, ८ जखमी; परिसरात घबराटीचे वातावरण
काही काळ नागरिकांनी पळापळ केली. त्यानंतर घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली. दरम्यान, घडलेला अपघात आणि गर्दी यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक खोळंबली
जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक अनधिकृत होर्डिंग्ज कोसळून दोघेजण ठार तर, आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली. महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष तसेच, पालिकेच्या सूचनेला होर्डिंगबाजांनी दाखवलेली केराची टोपली याचा एकत्रीत परिणाम या दुर्घटनेच्या माध्यमातून पहायला मिळाला. या घटनेत केवळ जीवीतच नव्हे तर, वित्तहानीही झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवरच हे होर्डिंग कोसळल्याने उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (५ ऑक्टोबर)दुपारच्या सुमारास घडली.
घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, पुणे शहरातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात एक लोखंडी होर्डींग उंचावर उभे होते. या होर्डिंगचे कटींग सुरु असताना ते अचानक खाली कोसळल्याने दुर्घटना घडली. होर्डींगखाली एकूण सातजण सापडले. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तसेच, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी झाले. त्यानंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली. बघ्यांच्या गर्दीला दूर करत पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान हे जीवघेणे होर्डिग हटवत आहे. दरम्यान, मृतांमध्ये एक दुचाकीस्वार तर, दुसरा रिक्षाचालक असल्याचे समजते. मात्र, या दोघांचीही नावे अद्याप समजली नाहीत.
होर्डिंग कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. काही काळ नागरिकांनी पळापळ केली. त्यानंतर घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली. दरम्यान, घडलेला अपघात आणि गर्दी यामुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक खोळंबली. नागरिकांची गर्दी आणि वाहनांची झालेली वाहतूक कोंडी पाहता पोलिसांनी वाहतूक इतर मार्गाकडे वळवली.
दरम्यान, कोसळलेले लोखंडी होर्डीग हे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे होर्डिंग हटविण्यासंबंधी पोलिकेने रेल्वेला पत्र दिले होते. होर्डिग्ज लावत असताना रेल्वेने नियमांचे उल्लंघन केल्याचा पालिकेने आक्षेप घेतला होता. मात्र, प्रशासकीय ढिसाळपणामुळे रेल्वेने पालिकेच्या पत्राला जमेत धरले नसल्याचा आरोप केला जात आहे.