मुंबई: नालासोपारा येथे तीन मुलांची हत्या करुन 35 वर्षीय पित्याची आत्महत्या

हे चारही मृतदेह पोस्टमार्टम साठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील मुंबई नजीकच्या नालासोपारा येथील एका 35 वर्षीय व्यक्तीने 3 मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे चारही मृतदेह पोस्टमार्टम साठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. पत्नी सोडून गेल्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.

कैलास परमार (35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो नालासोपाऱ्यातील डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा येथे राहत होता. काल (27 जून) शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास कैलास यांनी नंदीनी (8), नयना (3) आणि नयन (12) या तीन मुलांची चाकूने गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वतःवर देखील चाकूने वार करुन घेत आत्महत्या केली. (धक्कादायक: पतीने आत्महत्या केल्याची पाहून पत्नीनेही त्याच हुकाला गळफास लावून संपवले स्वत:चे जीवन; पुणे येथील घटना)

ANI Tweet:

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कैलास परमार हे लसूण विक्रीचा व्यवसाय करत होते. परंतु, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बुडल्याने सध्या ते घरीच होते. कैलास परमार यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यांपासून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. शनिवारी सकाळी त्याने फेसबुकवर पत्नीचा फोटो दुसऱ्या व्यक्ती सोबत पाहिला. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. रात्री वडील घरी जेवायला बोलवायला आले तेव्हा त्याने दरवाजा उघडला नाही. म्हणून शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत गेले असता कैलाससह त्याची तीनही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी घरात एक साडी छताला टांगलेली आढळून आली. यामुळे कैलासने चाकूने हत्या करुन आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.