प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून 16 वर्षाच्या मुलीला बापाने जिवंत जाळले

बाहेर प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून सख्ख्या वडिलांनी 16 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून 16 वर्षाच्या मुलीला बापाने जिवंत जाळले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

एकीकडे मुलींच्या जन्माचा, शिक्षणाचा उद्धार करायचा, तर दुसरीकडे मुलींच्या भावनांचा खून करायचा अशी स्थिती सध्याच्या पुढारलेल्या समाजाची आहे. आजच्या काळात प्रेम प्रकरणासारख्या गोष्टीलाही गुन्ह्याच्या नजरेतून पहिले जाते. असाच एक प्रकार नववर्षाच्या पूर्व संध्येला घडला आहे. मुलीचे बाहेर प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून सख्ख्या वडिलांनी 16 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या विरार परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.

विरारमध्ये मोहम्मद मन्सुरी हे पत्नी आणि 16 वर्षांची मुलगी शाइस्तासोबत राहतात. ही मुलगी घरकाम करण्याचे काम करते. काही दिवसांपासून मिलीच्या सतत फोनवर बोलत राहण्याने मोहम्मद यांना तिचे प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय येत होता. सोमवारी ही मुलगी फोनवर बोलत असताना, मोहम्मद यांनी तिला पहिले. त्यानंतर त्यांच्या रागाचा पारा चढला. मुलीचे हे वागणे आपल्याला आवडत नसल्याचे त्यांनी तिला सांगितले. संतापाच्या भरात त्यांनी शाइस्ताकडील मोबाइल फोन जमिनीवर आपटला. यानंतर मुलीला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर किचनमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले.

यानंतर त्याच अवस्थेत शाइस्ता घराबाहेर पळाली. शेवटी नागरिकांनी तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. या मुलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून, या आगीत ती 70 टक्के भाजली आहे. पोलिसांनी ताबडतोब या निर्दयी बापाला अटक केली असून, आता पुढील तपास चालू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2019 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).