Thane: 9 वर्षाच्या मुलाने शेजारी राहणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

ही घटना उल्हासनगर शहरातील आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

Thane: राज्यात अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 9 वर्षांच्या मुलाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या साडेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे की, 3 एप्रिल रोजी खेळण्याच्या बहाण्याने मुलाने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलाला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. (हेही वाचा - Pune: प्रेमसंबंधात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाची अपहरणानंतर हत्या, 9 जण अटकेत)

बंगालमधील नादियामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या -

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील हंसखली भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांतच आणखी एक अल्पवयील मुलगी तिच्या नातेवाईकाच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत, धंताळा येथे नातेवाइकाच्या घरी गेलेल्या 15 वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीचा मृतदेह तिच्या नातेवाईकाच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरोपी त्यापैकीच एक आहे का? हे त्यांनी स्पष्ट केले नाही. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, तक्रारीनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, पीडितेचे वडिल यावर समाधानी नाहीत आणि त्यांनी पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली आहे.