Thane: ठाणे शहरात बंगल्याला लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू; 4 जण जखमी
या घटनेत जयश्री भरत म्हात्रे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
Thane: ठाण्यातील (Thane) एका बंगल्याला (Bungalow) लागलेल्या आगीत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील चिंचपाडा (Chinchpada) परिसरात असलेल्या 'आई' (Aai) नावाच्या बंगल्यात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिला तिचा मुलगा आणि इतर तिघांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान महिला भाजली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत जयश्री भरत म्हात्रे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. (हेही वाचा - MNS Maha Sampark Abhiyan: शिवसेनेतील बंडखोरीचा राज ठाकरे घेणार फायदा; कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी 'महासंपर्क अभियान'ची घोषणा)
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच आगीत जयश्री म्हात्रे यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेत महिलेचा मुलगा आणि इतर तीन जण गंभीर भाजले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महिलेचा पती शहराबाहेर यात्रेला गेला होता. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.