Building Collapsed in Thane: ठाण्यात भीषण अपघात; इमारतीचा भाग कोसळून 2 महिलांसह चौघांचा मृत्यू; बचावकार्य चालू

ठाण्यातील उल्हासनगर शहरात पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे.

Image For Representation Building Collapsed (Photo Credit : ANI)

Building Collapsed in Thane: ठाण्यातून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील उल्हासनगर शहरात पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळून चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके ढिगारा हटवून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

उल्हासनगर तहसीलदार (महसूल अधिकारी) कोमल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये असलेल्या पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब सकाळी 11.30 च्या सुमारास कोसळला. या अपघातात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा - Crime: पुण्यात 13 वर्षीय विद्यार्थ्याला जातीयवादी शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल)

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत जवळपास 30 फ्लॅट होते. ही इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आली असून ती खाली करण्याच्या नोटिसा लोकांना यापूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. असे असूनही 50 कुटुंबे त्यात राहत होती.

स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथके, पोलीस, महसूल आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात सागर ओछानी (19), प्रिया धनवानी (24), रेणू ढोलनदास धनवानी (54) आणि ढोलदास धनवानी (58) यांचा मृत्यू झाला आहे.