औरंगाबाद: भटक्या कुत्र्याच्या चाव्याने 2 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मात्र याच भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे 2 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना औरंगाबाद (Aurangabad) परिसरात घडली. या घटनेने संपुर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्राला सहन करावा लागतो. मात्र याच भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे 2 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना औरंगाबाद (Aurangabad) परिसरात घडली. या घटनेने संपुर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. अक्षदा वावरे (Akshada Vavre) असे या चिमुकलीचे नाव आहे. औरंगाबादच्या  मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली. कुत्र्याने चावा घेतल्यावर उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

झी 24 तास ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षदा आपल्या अंगणात खेळत होती. त्यावेळी अनपेक्षितपणे भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने तिच्या अंगाला तसेच डोक्यालाही चावा घेतला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. त्यावेळी तात्काळ तिला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा- Lucky कुत्र्यासाठी एकवटले मुंबईकर, वरळीत अमानुष मारहाण प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांसह आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

या परिसरातील भटक्या कुत्र्यांबाबत अनेकदा तक्रार करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अक्षदाच्या जाण्याने संपूर्ण वावरे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले असताना रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना रंग लावून ती एका विशिष्ट जातीचे असल्याचे सांगून नागरिकांना फसविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फक्त 500 रुपयात खरेदी केलेल्या या कुत्र्यांच्या पिल्लांना पक्का रंग लावून त्याची 10 हजार रुपयात विक्री केली जात असल्याची गोष्ट उघडकीस आली आहे.