महाराष्ट्रातील तब्बल 17 शहरे प्रदूषित; तातडीने उपाययोजना करण्याची सूचना
या यादीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राती शहरांचा समावेश आहे
सध्या थंडीने चांगलाच जोर धरला आहे, वातावरण बदलामुळे सकाळी गोठवणारी थंडी आणि दुपारी अंगाची काहिली होणारे ऊन यांचा सामना लोकांना करावा लागत आहे. वातावरणावर प्रदूषणवाढीचाही परिणाम होताना दिसत आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत राजधानी दिल्लीमधील हवा ही सर्वात जास्त प्रदूषित हवा असल्याचे निदर्शनास आले होते. आश्चर्य म्हणजे त्यानंतर नंबर लागतो तो मुंबईचा. अशातच भारतातील अनेक शहरांनी प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. मात्र अजूनही प्रशासनाने त्यावर काहीच उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालया (CPCB) ने प्रदूषित अशा तब्बल 102 शहरांना तातडीने 'अॅक्शन प्लान' देण्याची सूचना दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 17 शहरांचा समवेश आहे.
मागच्या वर्षी पर्यावरण मंत्रालयाने देशातील 102 प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली होती. तातडीने या प्रदूषणावर काहीतरी उपाययोजना राबवण्यात यावी अशी सूचनाही केली होती. मात्र स्थानिक प्रशासनाचे या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही. या यादीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राती शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर इत्यादी शहरांचा समावेश आहे. (हेही वाचा : वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी ‘या’ उपायांचा आधार घ्या!)
सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड च्या माहितीनुसार पुणे, बदलापूर, उल्हासनगर, नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या शहरांमधील नायट्रोजन डाईऑक्साइडचा स्तर अतिशय धोकादायक असून, ही सर्वात प्रदूषित शहरे आहेत. मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि लातूर या शहरांनी त्यांचा उपाययोजना प्लान सदर केला होता, मात्र बोर्डाने तो नाकारून पुन्हा नवीन प्लान देण्याची सूचना केली आहे.