10 years of German Bakery Blast: पुण्यातील जर्मन बेकरी दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण; अजूनही फरार आहेत आरोपी
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये 13 फेब्रुवारी 2010 रोजी, सायंकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता
कला, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, लाइफस्टाइल या सर्वांच्याच बाबतील पुण्याने (Pune) भारताच्या नकाशावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तर पुण्यात मेट्रो धावणार आहे. म्हणूनच की काय ‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मात्र पूर्वीचे पुणे आजच्या सारखे नव्हते. शहरावर झालेल्या आघातामुळे पुणे क्षणार्धात प्रौढ बनले. यातीलच एक आघात म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध जर्मन बेकरीवर झालेला दहशतवादी हल्ला (German Bakery Terror Attack).
जर्मन बेकरी हल्ल्याला आज तब्बल दहा वर्ष पूर्ण होत आहेत. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये 13 फेब्रुवारी 2010 रोजी, सायंकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर, 56 नागरिक गंभीर जखमी झाले होते. संवेदनशील शहर अशी पुण्याची ओळख आहे. पुण्यात कशा सर्व गोष्टी आपल्याच गतीने दौडत असतात, मात्र या घटनेने पुण्याच्या गतीला वेगाने चालना दिली.
याप्रकरणी दहशवादविराधी पथकाने (ATS) हिमायत बेगला उदगीर येथून अटक केली होती. त्याच्या घरातून 1200 किलो स्फोटकांचा साठाही जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात एटीएसने एकून 40 जणांवर आरोप निश्चित केले होते. हिमायत बेग हा त्यातील मुख्य आरोपी होता. तर यासिन भटकळ याने त्याठिकाणी बॉम्ब ठेवला होता. त्यानंतर एकूण 7 जणांवरील आरोप सिद्ध झाले. मोहसीन चौधरी, यासिन भटकळ, रियाझ भटकळ, इक्बाल भटकळ, फय्याज कागझी, जबुउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल असे हे आरोपी होय. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातील 5 आरोपी तब्बल दहा वर्षानंतरही फरार आहेत. (हेही वाचा: 26/11 Mumbai Terror Attack : 26/11 च्या आठवणींची आजही सोनाली खरेच्या मनात धास्ती !)
भारत-नेपाळच्या सीमेवरून यासिन भटकळला अटक करून 2014 मध्ये त्याला एटीएसकडे देण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर खटला सुरु झाला. यादरम्यान, यासीनच्या साक्षीमुळे बेगची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी अद्याप सुनावणी झालेली नाही. यासीन भटकळ सध्या तिहार तुरुंगात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला न्यायालयातील तारखांना हजर करणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र रियाझ भटकळ, मोहसीन चौधरी, इक्बाल भटकळ, फय्याज कागझी हे आरोपी अजूनही फरार आहेत. हे सर्व आरोपी भारताबाहेर असल्याचा दावा एटीएसने केला आहे.