पावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)

पावसाच्या आगमनानंतर दऱ्याखोऱ्यातून कोसळणारे धबधबे पाहायचे असल्यास तुम्ही मुंबई व पुण्याच्या जवळच्या परिसरात या पाच ठिकाणांना भेट देऊ शकता.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Waterfalls Near Mumbai & Pune: राज्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनंतर दऱ्याखोऱ्यात हिरवळ पसरायला सुरवात झाली आहे, लांबचं कशाला साधं रोज लोकलने प्रवास करताना सुद्धा आजूबाजूचे डोंगर निहाळले तर सहज एखाद्या कपारीतून कोसळणारा धबधबा पाहायला मिळतोच. अशा निसर्गरम्य वातावरणात एखादी वन डे पिकनिक म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. मग वाट कसली बघताय? तुमच्या धावपळीच्या रुटीनमधून थोडासा वेळ काढून मुंबई आणि पुण्याच्या आसपासच्या भागातील या धबधब्यांना तुम्ही नक्की भेट द्यायला हवी. एक स्मार्ट टीप द्यायची झाल्यास या ठिकाणांना तुम्ही सुट्टीच्या दिवशी जाण्यापेक्षा आठवड्यातील वाराला गेल्यास कमी गर्दी मिळेल तसेच तुम्ही जास्त मजा देखील करू शकाल... चला तर मग पाहुयात कोणती आहेत ही ठिकाणे... पावसाळ्यात आपल्या जोडीदारासह चिंब भिजण्यासाठी महाराष्ट्रातील काही हटके ठिकाणे

भगीरथ धबधबा, अंबरनाथ

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी जवळचा भगीरथ धबधबा हा मुंबईपासून अवघ्या दोन ते अडीच तासांच्या अंतरावर आहे. हा धबधबा निर्धोक आहे. शिवाय इथला निसर्ग पर्यटकांना निखळ आनंद देतो म्हणूनच इथं दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय वांगणी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर बेडीसगाव या आदिवासी वाडीजवळ हा धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पण, या ठिकाणी जेवणाची सोय नाही. मुंबईतल्या रोजच्या धकाधकीनं त्रासलेल्यांसाठी भगीरथ धबधबा म्हणजे आनंदाची पर्वणीच.या धबधब्याला भेट देण्यासाठी १० रुपये शुल्क आकारण्यात येते,येथे संध्याकळै 5.30  वाजेपर्यंत थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे.

चिंचोटी धबधबा, वसई

वसई रोड स्थानकापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोटी गावाजवळचा चिंचोटी धबधबा हा पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. इथे पोहचण्यासाठी बस आणि रिक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, शिवाय, गावातूनच ओढय़ाच्या कडेकडेने जाणारी पायवाटेने तास-दीड तासात आपण पायी धबधब्याशी पोहचू शकता. धबधब्याच्या पोटाशी एका छोटा डोह आहे. तसेच थोडे वर गेल्यास इथून तुंगारेश्वर डोंगराचा छोटासा ट्रेक करता येतो शिवाय जळच पेल्हारचे धारण आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत चिंचोटी धबधबा परिसरात शेवाळे जमून घसरण होते त्यामुळे आताच या ठिकाण भेट देणे उचित ठरेल.

कुणे धबधबा, खंडाळा

पावसाळयात खंडाळ्याचे सृष्टीसौंदर्य कितपत खुलून येते हे काही नव्याने सांगायला नको. पण यावेळी खंडाळ्याला जाणार असाल तर, कुणे धबधब्याला आवश्य भेट द्या. कुणे धबधबा हा 200 मीटर वरून तीन टप्प्यात कोसळतो.यापैकी सर्वात उंच टप्पा 100 मीटर चा आहे. हा भारतातील धबधब्यांपैकी 14 व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या ट्रेन किंवा बसने या धबधब्यापाशी जाता येते.

मोहिली धबधबा, कर्जत 

मोहिली धबधबा हा कर्जत पासून 6  ते 7 किलोमीटर्स दूर आहे. मोहालीत प्रवेश करताना उल्हास नदी ओलांडून समोरच्या डोंगरात हा धबधबा आहे. डोंगर माथ्यावरुन मुंबई-पुणे रेल्वेचा बोगदा इथून दिसतो. मोहिलीत पोहोचण्यासाठी कर्जत रेल्वे स्टेशनहून श्रीराम पुलावरुन ऑटोरिक्षाने मोहिलीकडे जाता येतं. कर्जतपासून जवळ असा हा धबधबा आहे. याहून पुढे 7  किलोमीटर्स दूर गेल्यास कोंडाणाा परिसरात अनेक धबधबे आहेत. इथेही गावकऱ्यांना सांगितल्यास जेवण मिळू शकतं. कोंडाणा परिसरात तिन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि त्यावरुन जमिनीच्या ओढीने येणारे धबधबे विलक्षण दिसतात. जरुर अनुभवण्यासारखा हा परिसर आहे.

सोलनपाडा धबधबा, कर्जत

कर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हा धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदरआहे.सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ स्टेशन वरून दर पंधरा मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज पोहचता येते.

येत्या दिवसात तुम्ही जर या ठिकाणांना भेट द्यायचा विचार करत असाल तर पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षेची तरतूद करून मगच बाहेर पडावे कारण पाण्याच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे तुमच्या आनंदाला गालबोट लागल्यास तुम्हालाही आवडणार नाही, हो ना?

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now