#BoycotMaldives Trend: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन; EaseMyTrip कडून मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द

एव्हिएशन अँड टुरिझम कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भारतीयांनी मालदीवच्या सहलीची योजना आखली आहे त्यांना आवाहन केले जाते की, त्यांनी त्यांचे प्रवासाचे बेत रद्द करावे आणि मालदीवऐवजी लक्षद्वीप बेटांच्या सहलीचा गांभीर्याने विचार करावा.

Maldives (Photo Credits: Wikimedia Commons) .. Read more at: https://www.latestly.com/lifestyle/travel/national-tourism-day-2022-from-the-maldives-to-los-angeles-places-that-should-be-in-your-bucket-list-3677192.html

#BoycotMaldives Trend: सोशल मीडियावर भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर मालदीवविरुद्धचा (Maldives) देशभरातील लोकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मिडियावर #BoycottMaldives सह ट्विट करणे सुरू झाले आहे. विविध क्षेत्रातील अनेक लोकांनी मालदीवच्या मंत्र्यांच्या टिपण्णीबाबत निषेध नोंदवला आहे. या वादानंतर EaseMyTrip ने मालदीवसाठीचे सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केले आहे. आता इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने (Indian Chamber Of Commerce) मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आणि देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यटन आणि विमान वाहतूक शाखेने आपल्या सदस्यांना आणि पर्यटन असोसिएशनला मालदीवला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देणे थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एजंटना मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आणि देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भारतविरोधी भावना लक्षात घेऊन असोसिएशन ऑफ अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स ऑफ इंडिया (TAFI), अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ATOAI), असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर्स (ADTOI) आणि MICE एजंट्स मालदीवची जाहिरात करणे थांबवतील. भारतीय हे मालदीवमधील परकीय चलन आणि रोजगाराचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. (हेही वाचा: MakeMyTrip 'Beaches of India' Campaign: पीएम मोदींच्या भेटीनंतर मेक माय ट्रीपवर लक्षद्वीपबाबतच्या सर्चमध्ये 3400% वाढ; कंपनीने सुरु केली 'बीचेस ऑफ इंडिया' मोहीम)

एव्हिएशन अँड टुरिझम कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भारतीयांनी मालदीवच्या सहलीची योजना आखली आहे त्यांना आवाहन केले जाते की, त्यांनी त्यांचे प्रवासाचे बेत रद्द करावे आणि मालदीवऐवजी लक्षद्वीप बेटांच्या सहलीचा गांभीर्याने विचार करावा. तसेच मालदीवमध्ये कार्यरत असलेल्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांनाही आवाहन केले जात आहे की, त्यांनी त्यांचे कार्य स्थगित करावे आणि उडान योजनेअंतर्गत लक्षद्वीपमध्ये काम करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा.

यापूर्वी, EaseMyTrip चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर सर्व मालदीव फ्लाइट बुकिंग निलंबित करण्याची घोषणा केली आहे. मालदीवच्या एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर त्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने भारतात संतापाची लाट दिसून येत आहे. त्यानंतर एका दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.