Diwali 2018 : दिवाळीची सफाई करताना काढून टाका घरातून या गोष्टी नाहीतर निर्माण होईल वास्तुदोष
घरात सुख-समाधान राहावे, लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अशा गोष्टी त्वरीत घराबाहेर फेकून देणे गरजेचे आहे
दिवाळी सुरु होण्याआधी कित्येक दिवस लोक घरांची सफाई सुरु करतात. दिवाळीच्या काळात घराची स्वच्छता, सजावट यांसाठी आपला बराच वेळ आणि एनर्जी खर्च होते. म्हणूनच या सफाईचा फक्त दिवाळीसाठीच नाही तर आपल्या घरातील सुख, शांती, समाधानासाठीही फायदा झाला तर काय हरकत आहे? सफाई करताना घरातील अनके वस्तू, नको असलेल्या गोष्टी सफाई करून परत घरातच ठेवल्या जातात. मात्र अशा वस्तूंमध्ये काही वस्तू अशाही आहेत ज्यांमुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते, घरातील शांती भंग होऊन घरातील लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तरी घरात सुख-समाधान राहावे, लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अशा गोष्टी त्वरीत घराबाहेर फेकून देणे गरजेचे आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत अशा गोष्टी ज्या घरात ठेवणे अजिबात फायद्याचे नाही.
> फुटलेला अथवा तडे गेलेले आरसा –
फुटलेला आरसा घरात असणे हा वास्तुशास्त्रानुसार एक दोष आहे. या दोषामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते, ज्याचा परिणाम घरातल्या सदस्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो.
> तुटलेला पलंग –
वैवाहिक जीवनात सुख-शांती राहण्यासाठी पती-पत्नीचा पलंग तुटलेला नसावा. जर पलंग तुटलेला असेल तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.
> खराब झालेले घड्याळ –
घरात खराब झालेले घड्याळ ठेवल्याने कोणतेही काम तडीस जात नाही. घड्याळांच्या स्थितीनुसार आपल्या घराची प्रगती निश्चित होते. त्यामुळे खराब झालेल्या घड्याळामुळे घराच्या प्रगतीमध्ये बाधा येते.
> तुटलेली फोटो फ्रेम –
घरामध्ये एखादी फोटो फ्रेम तुटलेली असेल तर, अशी फ्रेम घरामधून काढून टाकावी. वास्तूनुसार हा एक वास्तुदोष आहे.
> तुटलेले सामान –
घरामधील तुटलेले डब्बे, फाटलेले कपडे, तुटक्या चप्पल,घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तुटलेली असेल तर, अशा वस्तू घरामधून ताबडतोप काढून टाकाव्यात, असे सामान घरामध्ये ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो.
> तुटलेल्या मुर्त्या –
तुटलेल्या मुर्त्या घरात ठेवल्याने घराचे भाग्य बदलत नाही. तसेच नेहमी अधोगतीचा सामना करावा लागतो. त्यामुळे घराचे दुर्भाग्य बदलण्यासाठी घरातील फुटलेल्या मुर्त्या नदीत अथवा समुद्रात वहाव्यात.
घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्या ठिकाणी सुखाची, पैशांची कमतरता राहते. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी ठेऊ नये.
लक्षात ठेवा की, घरातील उत्तर-पूर्व भाग नेहमी रिकामा ठेवावा. या ठिकाणी सामान ठेवल्यास वास्तुदोष उत्पन्न होतो. घरातील जड आणि अनावश्यक सामान घराच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये ठेवावे. इतर ठिकाणी जड सामान ठेवणे वास्तूनुसार अशुभ मानले जाते.