दुर्गादेवीची मूर्ती बनवण्यासाठी वापरतात वेश्यालयाची माती; जाणून घ्या कारण

कारण ही माती जितकी दुर्गा पवित्र आहे तितकीच पवित्र समजली जाते.

(Photo Credits: Wikimedia commons)

10 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात घट बसवून देवीचा उत्सव साजरा केला जातो, तर उत्तर भारतात नवरात्र आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे दुर्गापूजेची तयारी चालू आहे. देवीच्या आराधनेसाठी ठिकठीकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. बंगालमध्येतर काही लोक स्वतःच्या घरात 10 दिवस मूर्तीची स्थापना करतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे, देवीची मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालायासमोरील मातीचा उपयोग करतात. होय हे सत्य आहे कारण ही माती जितकी दुर्गा पवित्र आहे तितकीच पवित्र समजली जाते.

पश्चिम बंगालमध्ये उत्तर कोलकात्याच्या कुमरटली भागात जास्त प्रमाणात देवीच्या मुर्त्यांची निर्मिती केली जाते. इथल्या मुर्त्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. याचे कारण कारागिरांची कलाकुसर हे तर आहेच मात्र तसेच इथल्या मुर्त्या बनवल्या जातात त्या रेड लाईट एरिया ‘सोनाघाची’मधील मातीपासून. दुर्गा पूजेच्या आराधनेसाठी जी मूर्ती बनवतात त्यामध्ये विशेषतः 4 गोष्टींचा उपयोग केला जातो. गंगेच्या किनाऱ्यावरील माती, गोमुत्र, शेण आणि वेश्यालयाच्या अंगणातील माती.

जगभरात सर्वत्र वेश्यांना कमी लेखले जाते. इतर लोकांच्या दृष्टीने त्यांची कोणतीही किंमत नसते. मात्र देवीची मूर्ती बनवताना वेश्येच्या अंगणातील मातीचा उपयोग केला जातो. असे का असावे? तर प्राचीन काळी एक वेश्या देवी दुर्गेची असीम भक्त होती. या वेश्येला लोकांच्या तीरस्कारापासून वाचवण्यासाठी स्वतः देवीने तिच्या अंगणातील मातीचा उपयोग करून मूर्ती बनवली जावी हा वर दिला होता.

काही लोक असे मानतात की, एखादी व्यक्ती वेश्यालयात जाते तेव्हा स्वतःमधील चांगले गुण, पवित्रता वेश्येच्या दारातच सोडून आत जाते. त्यामुळे त्या व्यक्तीचे चांगले कर्म आणि त्याची शुद्धता बाहेर राहते, यामुळे वेश्येच्या अंगणातील माती पवित्र बनते. म्हणूनच मूर्ती बनवण्यासाठी अशा पवित्र मातीचा उपयोग केला जातो.

तसेच वेश्येने स्वतःसाठी ज्या जीवनाची निवड केली आहे, ते जीवन इतरांसाठी फार मोठा अपराध आहे. त्यामुळे वेश्यांना त्यांच्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांच्याच घरातल्या मातीचा उपयोग केला जातो.

वेश्यांना समाजाने वाळीत टाकलेले असते. समाजात त्यांना कोणतेही स्थान नसते. नाही एक समाज म्हणून त्यांचा कधी विचार केला जातो. मात्र संस्कृतीमधील एका महत्वाच्या सणाद्वारे या वेश्यांना समाजधारेचा एक हिस्सा म्हणून मान्यता मिळावी हाच प्रयत्न त्यांच्या अंगणातील मातीचा वापर करून केला जातो.