International Beer Day 2019: आरोग्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरेल बियर; फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

तर याच निमित्ताने जाणून घेऊया बियरचे काही आश्चर्यकारक फायदे...

International Beer Day 2019 (Photo Credits: Pixabay)

International Beer Day 2019:  पार्टीचा मूड मस्त करण्यासाठी किंवा विकेंडची मज्जा लूटण्यासाठी अनेकजण बियरचा पर्याय निवडतात. इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असलेली बियर तरुणाईची फेव्हरेट झाली आहे. मस्त चिल मारण्यासाठी देखील बियरचा आस्वाद घेतला जातो. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का की, बियरचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण त्यासाठी ती योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. अन्यथा बियरचे अतिरिक्त सेवन आरोग्यास घातक ठरु शकतं.

दरवर्षी 2 ऑगस्टला इंटरनॅशनल बियर डे (International Beer Day 2019) साजरा केला जातो. तर याच निमित्ताने जाणून घेऊया बियरचे काही आश्चर्यकारक फायदे...

किडनी स्टोनसाठी फायदेशीर

किडनी स्टोनने त्रस्त असाल तर या समस्येवर बियर पिणे नक्कीचा फायदेशीर ठरु शकते. योग्य प्रमाणात बियरचे सेवन केल्यास हळूहळू स्टोन मुत्राद्वारे बाहेर पडतो. फिनलँडची राजधानी हेलसिन्की मध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, रोज एक बियर प्यायल्याने स्टोन होण्याचा धोका 40% कमी होतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

बियर प्यायल्याने हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. खरंतर शरीरात कोलेस्ट्रॉल आणि चरबी जमा झाल्याने हृदयविकारांचा धोका वाढतो. मात्र बियरमुळे शरीरात कोलस्ट्रोल जमा होण्यास आळा बसतो. तसंच बियर हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे एका रिसर्चमधूनही सिद्ध झाले आहे.

हाडांच्या बळकटीसाठी

योग्य प्रमाणात बियर प्यायल्याने हाडे बळकट होतात. बियरमध्ये सिलिकॉन नावाचा घटक असतो, त्यामुळे हाडांना बळकटी येण्यास मदत होते. तसंच यामुळे म्हातारपणी हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. मात्र बियरचे अतिरिक्त सेवन हाडांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.

मधुमेह प्रतिबंधक

काही वर्षांपूर्वी हॉवर्डमध्ये झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की, एक किंवा दोन ग्लास बियर प्यायल्याने टाईप-2 डायबेटिज होण्याचा धोका 25% कमी होतो. बियरमधील अल्कोहोलमुळे शरीरात इन्सुलिनचे सेन्सिटिव्हीटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह रोखण्यास मदत होते.

मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत

बियरच्या सेवनाने डोक्यात रक्तसंचार अधिक चांगला होतो. यामुळे रक्तातील गुठळ्या कमी होऊन स्ट्रोकचा धोका दूर होण्यास मदत होते. याशिवाय स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते. बियरच्या संतुलित सेवनाने अल्झाइमर, डिमेंशिया यांसारख्या आजारांचा धोका 23% कमी होतो. तसंच मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होते.

कॅन्सरशी सामना करण्यास

बियरच्या सेवनाने कॅन्सरशी सामना करण्यास मदत होते. इडाहो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनुसार, बियरचा उपयोग कॅन्सरशी लढण्यास होतो. बियर बनवण्यासाठी हॉप्स नावाच्या झाडाचा वापर केला जातो. यात असलेल्या ह्युमूलोन्स आणि ल्युपूलोन्स नावाच्या अॅसिडमुळे बॅक्टेरिया आणि आजार वाढण्यास आळा बसतो.

निद्रानाशाचा त्रास दूर करण्यासाठी

इन्सोम्निया म्हणजेच निद्रानाशाचा त्रास दूर करण्यासाठी बियर फायदेशीर ठरते. रात्री जेवणानंतर एक ग्लास बियर प्यायल्याने डोपामाईन हार्मोनचा अधिक स्त्रवू लागतं आणि त्यामुळे शरीर व मन रिलॅक्स होतं.

केसातील कोंड्यावर गुणकारी

केसातील कोंडा दूर करण्यासाठी अनेक जाहिरातींना बळी पडून तुम्ही विविध प्रॉडक्ट्स ट्राय केले असतील. त्यात घरगुती उपायही असतीलच. पण बियर हा केसातील कोंडा दूर करण्याचा नैसर्गिक उपाय आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? बियरमध्ये असलेल्या यीस्ट आणि व्हिटॉमिन बी च्या अधिक प्रमाणामुळे केसातील कोंडा दूर होऊन केस चमकदार होण्यास मदत होते.

शरीरातील रक्तसंचार सुधारुन पचकक्रिया सुरळीत करण्यास बियर उपयुक्त ठरते. याशिवाय बियरमुळे वजनही कमी होण्यास मदत होते. मात्र बियरचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. कारण बियरचे अतिरिक्त सेवन आरोग्यास धोकादायक ठरु शकते.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)