Garbh Sanskar: आता गर्भात वाढणारे मूल शिकणार भारतीय संस्कृती; RSS ने सुरु केले 'गर्भ संस्कार' अभियान
यामध्ये सकारात्मक विचार करणे, चांगली पुस्तके वाचणे, चांगल्या हेतूने तयार केलेले ताजे सात्विक अन्न खाणे, नियमित योगासने करणे आणि पोटातील मुलाशी बोलणे यांचा समावेश होतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित शाखा संवर्धिनी न्यासने (Samvardhinee Nyas) गर्भ संस्कार (Garbha Sanskar) नावाची नवीन मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून ट्रस्ट गर्भवती महिलांना त्यांच्या मुलांना संस्कारी बनवायला शिकवणार आहे. न्यासच्या राष्ट्रीय संघटन सचिव माधुरी मराठे यांच्या म्हणण्यानुसार, न्यास स्त्रीरोगतज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टर आणि योग प्रशिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भातील बाळांना सांस्कृतिक मूल्ये शिकवण्यासाठी, गर्भधारणेदरम्यान गीता, रामायण पाठ आणि योगाभ्यास अशा कार्यक्रमाची योजना आखत आहे.
मराठे म्हणाल्या की, गर्भात असलेल्या बाळापासून ते दोन वर्षांच्या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत गीतेतील श्लोक आणि रामायणातील पाठ यांवर भर दिला जाणार आहे. त्या म्हणाल्या की, गर्भात मूल 500 शब्द शिकू शकते. त्यामुळे या मोहिमेचा उद्देश असा कार्यक्रम विकसित करणे ज्याद्वारे मूल गर्भातच संस्कार शिकेल आणि ही प्रक्रिया मूल दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत चालू राहील.
संघाची महिला शाखा संवर्धिनी न्यास ही मोहीम किमान 1,000 महिलांपर्यंत नेण्याची योजना आखत आहे. मराठे म्हणाल्या की, या मोहिमेअंतर्गत ट्रस्टने रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एक कार्यशाळा आयोजित केली होती, ज्यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस-दिल्लीसह अनेक रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. या अभियानामध्ये गर्भवती महिलांना भगवान राम, हनुमान, शिवाजी महाराज यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आणि संघर्ष याविषयी शिकवले जाईल, जेणेकरुन गर्भात असलेल्या मुलावर तसे संस्कार होतील. (हेही वाचा: Summer and Health: उन्हाळा वाढतो आहे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करायला हवे? घ्या जाणून)
दरम्यान ऋग्वेदात गर्भसंस्काराचा उल्लेख आढळतो. गर्भसंस्कार हे गरोदरपणात आनंदी राहण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. यामध्ये सकारात्मक विचार करणे, चांगली पुस्तके वाचणे, चांगल्या हेतूने तयार केलेले ताजे सात्विक अन्न खाणे, नियमित योगासने करणे आणि पोटातील मुलाशी बोलणे यांचा समावेश होतो.