COVID 19 Vaccine FAQs: कोविड 19 लसींमुळे वंध्यत्व येते का ते भविष्यात बूस्टर डोस घेण्याची वेळ आली तर तीच लस घ्यावी लागते का? पहा तुमच्या मनातील लसीकरणाबाबतच्या प्रश्नांची एक्सपर्ट उत्तरं

आजही अनेकांच्या मनात कोविड 19 लसीच्या बाबतीत अनेक प्रश्न, शंका असल्याने ते लसीकरणापासून दूर राहत आहेत.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

लवकरच डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस उपलब्ध होणार आहे. ही लस झायडस कॅडिला भारतात विकसित करत असून अशा प्रकारची ती जगातील पहिली लस असणार आहे. त्याचबरोबर, बायोलॉजिकल-इ नावाची लसही लवकरच उपलब्ध होणार असून ती प्रथिनाच्या उपघटकांवर आधारित आहे. NTAGI म्हणजेच 'लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट' यातील कोविड-19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा यांनी ही माहिती दिली. या लसींच्या प्रायोगिक चाचण्या अतिशय उत्साहवर्धक रीतीने पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली. "सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 2-8 अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येणारी भारतीय बनावटीची एम-आरएनए लसही सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आणखी दोन लसी- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची नोव्हाव्हॅक्स आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लस- याही लवकरच येणे अपेक्षित आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटची उत्पादनक्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामुळे देशातील लसपुरवठा वाढू शकेल. ऑगस्टपर्यंत एका महिन्यात 30-35 कोटी मात्रा खरेदी करता येण्याची अपेक्षा आहे." यामुळे एका दिवसात एक कोटी व्यक्तींना लस टोचता येईल, असा अंदाज डॉ.अरोरा यांनी व्यक्त केला.

भारताच्या कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या या आणि अशा अनेक पैलूंवर अध्यक्षमहोदयांनी प्रकाश टाकला. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा ओटीटी मंच असणाऱ्या 'इंडिया सायन्स चॅनेल' या वाहिनीसाठी त्यांनी ही मुलाखत दिली.

नव्या लसी कशा आणि किती प्रभावशाली ठरतील?

आपण जेव्हा म्हणतो की एखादी लस 80% परिणामकारक आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, त्या लसीमुळे कोविड-19 होण्याची शक्यता 80% नी कमी होते. संसर्ग आणि रोग यामध्ये फरक आहे. एखाद्या व्यक्तीला कोविडची लागण झाली असेल परंतु ती लक्षणविरहित असेल, तर त्या व्यक्तीला केवळ संसर्ग झालेला असतो. मात्र, एखाद्या व्यक्तीमध्ये संसर्गामुळे लक्षणे दिसून येत असतील तर तिला कोविड रोग झाला आहे असे समजावे. जगातील सर्व लसी, कोविड रोगाला आळा घालण्याचे काम करतात. लसीकरणानंतर तीव्र रोग होण्याची शक्यता अगदी कमी असते, तर लसीकरणानंतर मृत्यू ओढवण्याची शक्यता अगदीच नगण्य म्हणावी इतकी कमी असते. जर एखाद्या लसीची परिणामकारकता 80% असेल, तर लस घेतलेल्यांपैकी 20% लोकांना सौम्य प्रमाणात कोविड होण्याची शक्यता असते.

भारतात उपलब्ध असलेल्या लसी कोरोना विषाणूच्या फ़ैलावाला पायबंद घालण्यासाठी समर्थ आहेत. जर 60%-70% लोकांचे लसीकरण झाले, तर विषाणूच्या फ़ैलावाला आळा बसेल.

सरकारने कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात ज्येष्ठांच्या लसीकरणाने केली, जेणेकरून रोगाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या लोकसंख्येस प्रथम लस मिळेल व त्यायोगे मृत्यूंचे प्रमाण आणि आपल्या आरोग्यसेवांवरील ताण कमी होईल.

कोविड लसींबद्दल बरीच चुकीची माहिती पसरते आहे. आपण कृपया याबद्दल अचूक माहिती द्याल का?

नुकताच मी हरियाणा आणि उत्तरप्रदेशात जाऊन तेथील शहरी आणि ग्रामीण जनतेशी संवाद साधला. लस घेण्यातील टाळाटाळ, दडपण, शंका-कुशंका, दोलायमानता समजून घेण्याचा प्रयत्न केला. मुखत्वे ग्रामीण भागातील अनेक लोक कोविडचा गांभीर्याने विचारच करीत नाहीत आणि त्याला साध्या तापाप्रमाणेच समजण्याची गफलत करतात. अनेक जणांच्या बाबतीत कोविड सौम्य असू शकतो, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. परंतु जेव्हा तो तीव्र गंभीर रूप धारण करतो तेव्हा तो आर्थिकदृष्ट्याही जड पडतो आणि प्रसंगी त्यातून रुग्णाला प्राणही गमवावे लागतात.

आपण लस घेऊन कोविडपासून आपले संरक्षण करू शकतो, ही बाबच किती दिलासादायक आहे ! भारतात उपलब्ध असलेल्या कोविड-19 लसी सर्वथा सुरक्षित आहेत यावर आपण सर्वांनी भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. सर्व लसींच्या काटेकोरपणे व प्रचंड प्रमाणात चाचण्या/ तपासण्या झालेल्या आहेत आणि जागतिक स्तरावर सर्वमान्य असलेल्या क्लिनिकल चाचण्याही झालेल्या आहेत, याची मी ग्वाही देतो.

साइड-इफेक्ट्सचा विचार करता, सर्वच लसींचे काही सौम्य साइड-इफेक्ट्स असतातच. यामध्ये एक ते दोन दिवस किंचित ताप, थकवा, सुई टोचलेल्या जागी दुखणे इत्यादींचा समावेश होतो. मात्र लसीमुळे कोणतेही गंभीर साइड-इफेक्ट्स होत नाहीत.

जेव्हा बालकांना त्यांच्या नियमित/ नेहमीच्या लसी टोचल्या जातात तेव्हा त्यांच्यामध्येही काही साइड-इफेक्ट्स दिसून येतात- जसे ताप, सूज इत्यादी. असे साइड-इफेक्ट्स असले तरी बालकासाठी ती लस हितकारकच आहे, हे कुटुंबातील मोठ्यांना माहीत असते. तसेच, आता मोठ्या माणसांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, ‘कोविड प्रतिबंधक लस आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी महत्त्वाची आहे. म्हणून सौम्य अशा साइड-इफेक्ट्सचा बाऊ करून आपण लस घेण्यापासून परावृत्त होता कामा नये.’

'एखाद्या व्यक्तीला लसीकरणानंतर ताप आला नाही तर त्याअर्थी लस काम करत नाही', अशी वदंता आहे. ती कितपत खरी आहे?

बहुतांश लोकांमध्ये कोविड लसीकरणानंतर कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसून येत नाहीत, पण 'लसी कार्यक्षम नाहीत' असा त्याचा अर्थ नाही. केवळ 20% - 30% लोकांनाच लसीननंतर ताप येईल. काही लोकांना पहिल्या मात्रेनंतर ताप येईल व दुसऱ्या मात्रेनन्तर जराही ताप येणार नाही, तर काहींचे अगदी उलटे होईल. ही गोष्ट व्यक्तिपरत्वे बदलते आणि याबद्दल अनुमान लावणे अतिशय अवघड आहे.

काहींच्या बाबतीत असेही घडलेले निदर्शनास आले आहे, की लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. त्यामुळे काही लोक लसींच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्नचिह्न उगारत आहेत.

लसीच्या अगदी दोन्ही मात्रा घेतल्यावरही संसर्ग होऊ शकतो. परंतु अशावेळी रोगाचे स्वरूप नक्कीच सौम्य असते आणि आजार गंभीर होण्याची शक्यता जवळपास नगण्य होऊन जाते. यापुढे जाऊन असे सांगतो, की हे टाळण्यासाठीच लोकांना लसीनंतरही कोविड-समुचित वर्तनाचे पालन करण्यास सांगितले जाते. लोक विषाणूचे वहन करू शकतात, म्हणजे विषाणू तुमच्यामार्फत तुमच्या कुटुंबीयांपर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचू शकतो. समजा, 45 वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले नसते, तर मृत्यूचे प्रमाण आणि रुग्णालयांवरील भार या दोन्हींची कल्पनाही करता आली नसती. आता, दुसरी लाट ओसरण्याच्या बेतात आहे याचे श्रेय लसीकरणालाच आहे.

शरीरात अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे किती काळ अस्तित्वात असतात? काही काळानंतर आपणास बूस्टर डोस घेण्याची गरज पडेल काय?

लसीकरणाने विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीची खातरजमा, प्रतिपिंडे विकसित झाल्यावरून नक्कीच करता येते. प्रतिपिंडे दिसूही शकतात व मोजताही येऊ शकतात. याशिवाय, एका अदृश्य प्रतिकारशक्तीही विकसित होते. तिला 'टी-पेशी' असे म्हणतात. तिला स्मरणशक्ती असते. त्यामुळे, आता यांनतर जेव्हा जेव्हा तसा विषाणू शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा पूर्ण शरीर सावध होईल आणि त्याच्या विरोधात काम करण्यास सुरुवात करील. म्हणजेच, प्रतिपिंडांचे अस्तित्व ही काही आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीची एकमेव खूण नव्हे. म्हणून, लसीकरणानंतर अँटीबॉडीज टेस्ट करण्याची, त्याबद्दल काळजी करत राहण्याची नि स्वतःची झोप उडवून घेण्याची काही गरज नाही.

दुसरे असे की, कोविड-19 हा जेमतेम दीड वर्षांपूर्वी आलेला नवाच रोग आहे, आणि लसी देण्यास सुरुवात होऊनही फार तर सहा महिने झाले आहेत. पण असे दिसते आहे की, अन्य साऱ्या लसींप्रमाणेच प्रतिकारशक्ती किमान सहा महिने ते एक वर्षापर्यंत टिकेल. जसजसा काळ पुढे जाईल, तसतसे आपले कोविड-19 विषयीचे ज्ञान आणि आकलनही सुधारत जाईल. तसेच, 'टी-पेशींसारखे' काही घटक मोजमापाच्या पलीकडे असतात. लसीननंतर किती काळ लोकांना गंभीर आजार आणि मृत्यूपासून वाचवता येईल, हे पाहावेच लागेल. परंतु, सध्या तरी, लस घेतलेल्या सर्व व्यक्ती सहा महिने ते एक वर्षापर्यंत सुरक्षित राहतील.

एकदा आपण एखाद्या कंपनीची लस घेतली की आपण पुढच्यावेळी तीच लस घेतली पाहिजे का? जर आपल्याला भविष्यात बूस्टर डोस घेण्याची वेळ आली तर तेव्हाही आपण त्याच कंपनीची लस घेतली पाहिजे का?

आपण कंपन्यांच्या ऐवजी संबंधित मंचांबद्दल बोलूया. एकाच रोगावरील लस शोधण्यासाठी भिन्नभिन्न प्रक्रिया आणि मंचांचा वापर व्हावा, असे मानवी इतिहासात यापूर्वी कधीच झाले नाही. या लसींच्या उत्पादन प्रक्रिया वेगवेगळ्या असल्याने शरीरावरील त्यांचे परिणामही एकसमान नसतील. दोन मात्रांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घेणे, किंवा (गरज पडल्यास) पुढे बूस्टर डोस घेताना वेगळीच लस घेणे या प्रकाराला अदलाबदली असे म्हणतात. 'तसे करता येईल का?', हा एक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रश्न आहे. त्यावर उत्तराचा शोध चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कोविड-19 लसी दिल्या जाणाऱ्या काही निवडक देशांमध्ये आपण एक आहोत. अशी अदलाबदली केवळ तीन कारणांसाठी केलेली चालू शकते- 1) तसे करण्याने प्रतिकारशक्ती वाढते/ सुधारते, 2)लस देण्याच्या कार्यक्रमात त्याने सुलभता येते, 3) सुरक्षिततेची हमी असेल तर. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे अशी अदलाबदल करण्याची वेळ येऊ नये, कारण लसीकरण ही पूर्णपणे वैज्ञानिक व शास्त्रीय संकल्पना आहे.

बाहेरच्या काही देशांमध्ये लसींच्या सरमिसळीबद्दल संशोधन चालू आहे. भारतातही असे काही संशोधन चालू आहे काय?

असे संशोधन आवश्यकच आहे आणि भारतातही लवकरच काही प्रमाणात असे संशोधन सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही आठवड्यांतच त्यास सुरुवात होईल.

बालकांच्या लसीकरणाविषयी काही अभ्यास सुरु आहेत का? बालकांसाठी केव्हापर्यंत लस येणे अपेक्षित आहे?

वयाच्या 2–18 वर्षे गटातील बालकांसाठी कोवॅक्सीनच्या लसीची तपासणी सुरु झाली आहे. देशभरातील अनेक केंद्रांमध्ये बालकांवर लसीच्या तपासण्या सुरु आहेत. यावर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत त्याचे निकाल अपेक्षित आहेत. बालकांना संसर्ग होऊ शकतो, परंतु ती गंभीर आजारी पडत नाहीत. मात्र, बालके ही विषाणूचे वाहक बनू शकतात. यास्तव, बालकांनाही लस देणे आवश्यक आहे.

प्र) लसींमुळे वंध्यत्व येते का?

पोलिओची लस नव्याने आली व ती भारतासह जागाच्या निरनिराळ्या भागांत टोचली जात होती, तेव्हाही अशा अफवा पसरल्या होत्याच. त्यावेळी अशी अफवा होती की, 'ज्या बालकांना आत्ता पोलिओची लस देण्यात येत आहे त्यांना भविष्यात वंध्यत्व येऊ शकते'. लसींच्या विरोधात एकत्रितपणे प्रयत्न करणाऱ्यांकडून अशी चुकीची व खोटी माहिती पसरविली जाते. आपणास हे ठामपणे माहिती असायला हवे, की सर्व लसी आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी कठोर वैज्ञानिक संशोधनांमधून पार पडल्या आहेत. कोणत्याही लसीला अशा प्रकारचा साइड-इफेक्ट नाही. मी प्रत्येकाला खात्रीशीरपणे हे सांगू इच्छितो की, अशा अपप्रचारामुळे लोकांची फक्त दिशाभूल होते. कोरोना विषाणूपासून आपले, कुटुंबाचे आणि समाजाचे संरक्षण हे आपले मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे, प्रत्येकाने पुढे येऊन स्वतःहून लस घेतली पाहिजे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now