Diwali 2018 : दिवाळीच्या उत्साहात हेल्दी राहण्यासाठी खास '6' टिप्स !

मगच तुम्ही मनमुराद दिवाळीचा आनंद लुटू शकाल.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

दिवाळी काही दिवासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तुम्हीही दिवाळीच्या तयारीला सुरुवात केली असेल. दिवाळी आनंदात, जल्लोषात सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हीही कंबर कसून कामाला लागला असाल. साफसफाईपासून ते शॉपिंगपर्यंत.... पण ही दिवाळी आनंदी असण्याबरोबरच निरोगी आणि आजारांपासून मुक्त असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मगच तुम्ही मनमुराद दिवाळीचा आनंद लुटू शकाल. त्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स तुमची नक्कीच मदत करतील....

साफसफाई करताना रुमाल बांधा

दिवाळी तोंडावर येताच सगळ्या घरांमध्ये साफसफाईची धांदल उडते. अगदी जुन्या पुराण्या वस्तू काढून साफ केल्या जातात. वर्षभर ज्या ठिकाणी ढुंकूनही पाहिले जात नाही त्या सगळ्या ठिकाणी हात फिरु लागतो. घर अगदी चकचकीत करण्याकडे सर्वांचा भर असतो. पण यंदा दिवाळीत साफसफाई करताना थोडी काळजी घ्या. कारण धुळीमुळे सर्दी, खोकला होऊन दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरु शकते. त्यामुळे साफसफाई करताना नाका-तोंडाला रुमाल अवश्य बांधा.

overexertion करु नका

दिवाळीची तयारी म्हटल्यावर साफसफाई, शॉपिंग, फराळ करणं आलंच. त्याचबरोबर आपली दैनंदिन कामंही असतातच. त्यामुळे खूप धांदल उडू शकते. दमछाक होऊ शकते. पण उत्साहाच्या भरात अति काम करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. म्हणून overexertion टाळा.

तेलकट, गोड पदार्थांचे प्रमाणात सेवन

दिवाळी म्हटलं की, फराळ, मिठाई आलीच. त्यामुळे वर्षातून एकदा बनणाऱ्या फराळावर मस्त ताव मारला जातो. पण या पदार्थांचे अति सेवन आरोग्यास घातक ठरु शकते. त्यातच आजकाल मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आजार सामान्य झाले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी तेलकट, गोड पदार्थांचे सेवन प्रमाणातच करणे योग्य ठरेल किंवा मग शुगर फ्री गोडाचे पदार्थ हा पर्याय मधुमेहींसाठी फायदेशीर ठरेल. तसंच मित्रमंडळी, आप्तांकडून होणारा गोडाच्या आग्रहाला नाही म्हणण्यास शिका.

आहार आणि फराळाचे पदार्थाचे संतुलित सेवन

दिवाळीत गोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे कधीही, केव्हाही गोड पदार्थ खाल्ले जातात. काही वेळेस अति खाल्ल्याने पोट भरते आणि मग जेवण टाळले जाते. मात्र मिठाई ही नाश्ता, जेवण यांना पर्याय असू शकत नाही. त्यामुळे गोडाचे पदार्थ प्रमाणातच खावेत. त्याचबरोबर नाश्ताला फराळाचे पदार्थ खाणे टाळावे.

भरपूर पाणी प्या

दिवाळी थंडीच्या दिवासात येत असल्याने फार तहान लागत नाही. तसंच अनेकदा कामाच्या गडबडीत किंवा नातेवाईक/मित्रमंडळींच्या भेटीगाठीच्या धावपळीत पुरेसे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. पण तुम्ही ही चूक करु नका. डिहाड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

मोकळ्या जागेत फटाके उडवा

दिवाळीचे अजून एक आकर्षण म्हणजे फटाके. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना फटाके फोडण्याची क्रेझ असते. पण लहान जागेत, गल्लीत, लहानशा बोळात फटाके फोडणे टाळा. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी मोकळ्या जागेत फटाके उडवा आणि दिवाळीचा आनंद लूटा.