Covid-19 Subvariants in India: देशात ओमायक्रॉनच्या BA.4 व्हेरिएंटनंतर आता BA.5 प्रकाराची पुष्टी; तामिळनाडू आणि तेलंगानामध्ये आढळले रुग्ण
या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत
सध्या भारतात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचा वेग मंदावला असला तरी अनेक राज्यांमध्ये कोरोना अजूनही डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत, कोरोनाच्या नवीन प्रकारांबद्दलच्या बातम्या भयावह आहेत. रविवारी, केंद्रीय संस्था INSACOG ने भारतात कोविड-19 च्या BA.4 आणि BA.5 प्रकारांची पुष्टी केली आहे. वृत्तानुसार, कोरोनाचे हे दोन्ही प्रकार Omicron चे सब व्हेरिएंट आहेत.
या प्रकारांमुळे, या वर्षाच्या सुरुवातीला देशात संसर्गाची एक मोठी लाट आली होती. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium या संयुक्त संस्थेने म्हटले आहे की, तामिळनाडूमधील 19 वर्षीय महिलेला BA.4 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या महिलेचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले होते. तिच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नव्हती.
दुसरे प्रकरण तेलंगणातील आहे, जिथे 80 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या BA.5 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. या व्यक्तीनेही लसीचे दोन्ही डोस घेतले होते. INSACOG ने सांगितले की दोन्ही रुग्णांचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही. (हेही वाचा: ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा कम्यूनिटी स्प्रेड सुरू; सरकार हाय अलर्टवर)
महामारी सुरु झाल्यापासून भारतामध्ये जवळजवळ 4.31 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 4.25 कोटी लोक बरे झाले आहेत, तर 5 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर हजारो लोकांना जबरदस्तीने क्वारंटाईन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आग्नेय बीजिंगमधील नानझिन्युआन हाउसिंग कॉम्प्लेक्समधील 13,000 हून अधिक नागरिकांना हॉटेलमध्ये वेगळे ठेवण्यात आले होते.