Beauty Tips For Summer: मुलायम केस आणि टवटवीत त्वचेसाठी ताकाचा 'असा' ही करता येईल वापर; जाणून घ्या
ताकाचा वापर करून तुम्ही उन्हाळ्यात मुलायम केस आणि टवटवीत त्वचा मिळवू शकाल हे जाणून घेऊयात..
Summer 2020: दिवसागणिक आता उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. देशभरात अनेक शहरात तापमान उच्चांकी स्तरावर आहे. या उन्हाळयात आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते, अंतर्गत आरोग्यासोबतच आपली त्वचा आणि केसांची काळजी घेणे सुद्धा उन्हाळ्यात निकडीचे होऊन बसते. दरवर्षी याकाळात स्पा, पार्लर मध्ये जाऊन सर्वाधिक जण ट्रीटमेंट घेत असतात. यंदा मात्र लॉक डाऊन मुळे कोणालाही घरातून बाहेर पडणे शक्य होणार नाहीये त्यामुळे घरीच राहून आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आता आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यात ताकाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढते. ताक (Buttermilk) हे शरीराला थंडावा देण्यासाठी तसेच पाचनशक्ती वाढवण्यासाठी अगदी गुणकारक आहे हे तर आपण जाणतोच मात्र त्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी सुद्धा ताकाचा कमाल उपयोग होतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग ताकाचा वापर करून तुम्ही उन्हाळ्यात मुलायम केस आणि टवटवीत त्वचा मिळवू शकाल हे जाणून घेऊयात..
त्वचेसाठी का उपयुक्त आहे ताक
ताक हे लॅक्टिक ऍसिडयुक्त असते त्यामुळे त्यात ब्लिचिंग तत्व असतात. वाढत्या वयाच्या खुणा हटवणे, काळी पडलेली त्वचा उजळवणे, डाग घालवणे अशा अनेक कामांसाठी ताकाचा वापर होतो. Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?
ताक वापरण्याची पद्धत
> बेसन, गुलाबपाणी आणि मुलतानी माती यामध्ये ताक मिक्स करून त्याचा पॅक चेहऱ्याला लावू शकता. चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास याची मदत होते.
> संत्र्याची साले वाळवून त्याची पावडर करा आणि या पावडर मध्ये ताक मिसळून चेहऱ्याला पॅक लावा. स्क्रब म्ह्णून काम करणारा हा बेस्ट पर्याय आहे.
> सनबर्न किंवा डॅमेज त्वचा हटवण्यासाठी पपई किंवा टोमॅटोसोबत ताक मिक्स करून लावून घ्या. 15 मिनिटे ठेवून चेहरा थंड पाण्याने धुवून काढा.
केसांसाठी का उपयुक्त आहे ताक
कोरड्या केसांसाठी ताक म्हणजे जणू काही जादू सारखे काम करते. दुधात ताक मिसळून केसांना लावल्यास नैसर्गिक रित्या केस स्ट्रेट होऊ शकतात. तसेच कोंडा घालवण्यासाठी सुद्धा ताकाचा वापर होतो. उन्हाळयात केसात घाम येऊन खाज येऊ लागते अशावेळी ताकाचा वापर करून केसांचे आरोग्य राखून ठेवू शकता.
ताक वापरण्याची पद्धत
> ताक थेट केसांना लावायचे नाहीये तर हेअर पॅक बनवून मग केसांना लावायचे आहे.
>हेअर पॅकसाठी एक अँड, ऑलिव्ह ऑइल (उपलब्ध असल्यास) एक केळं, किंचित मध आणि लिंबू घेऊन नीट मिक्स करा आणि हा पॅक केसांना लावा. थोड्यावेळाने केस धुवून टाका
>ताकात लिंबाचा रस मिक्स करून 15 मिनिटं मालीश करा आणि मग कोमट पाण्याने केस धुवून टाका. केसांतील खाज आणि डँड्रफ दूर होतो.
दरम्यान, ताकामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पाणी असते ज्यामुळे तुम्हाला त्वरीत उर्जा मिळते. यासाठी अशक्तपणा अथवा थकवा दूर करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते.
(टीप: प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित लेख लिहिण्यात आला आहे.यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)