Pitru Paksha 2019: पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणात काकडी वडे आणि तांदळाची खीर बनवण्यासाठी या झटपट रेसिपीज करतील मदत (Watch Video)

या कार्यक्रमात नैवेद्यासाठी तांदळाची खीर आणि काकडीचे वडे या पारंपरिक बेताचा आवर्जून समावेश असतो. यंदा तुम्हीही हा बेत करू इच्छित असाल तर या झटपट रेसिपीज तुम्हाला नक्की मदत करतील.

kakdi Vade And Rice Kheer (Photo Credits: Youtube, Pixabay)

हिंदू पुराणानुसार भाद्रपद शुक्ल पंधरवडा हा काळ पितृ पक्ष (Pitru Paksha 2019) म्हणून ओळखला जातो. आज म्हणजेच 14 सप्टेंबर पासून ते 28 सप्टेंबर पर्यंत यंदा पितृपक्ष असणार आहे. या पंधरवड्यात आपल्या मृत पूर्वजांना तृप्ती आणि शांती मिळावी याकरिता प्रार्थना केली जाते. असं म्हणतात की, पितृपक्षच्या कालावधीत आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येतात, यावेळी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना नैवैद्य दाखवला जातो. श्राद्धांचं जेवण, ब्राम्हणपूजा आणि ब्राम्हणभोजन या तीन प्रकारात पार पडणारा या कार्यक्रमात नैवेद्यासाठी तांदळाची खीर आणि काकडीचे वडे या पारंपरिक बेताचा आवर्जून समावेश असतो.

खरंतर हे पदार्थ ऐकायला सोप्पे असले तरी करण्यासाठी तितकेच किचकट मानले जातात, पण चिंता करू नका यंदा तुम्हीही हा बेत करू इच्छित असाल तर या झटपट रेसिपीज तुम्हाला नक्की मदत करतील.. चला तर मग पाहुयात सोप्प्या पद्धतीने कसे बनवाल काकडी वडे आणि तांदळाची खीर..

काकडीचे वडे रेसिपी

साहित्य -मोठी काकडी (बाजारात या सीझननुसार नेहमीपेक्षा मोठ्या आकाराची काकडी उपलब्ध असते), मीठ, पाणी, वड्याचं पीठ

कृती- काकडी सोलून ती किसून घ्या. काकडीचा किस थोडा वाफवून घ्यावा. वाफवलेल्या काकडीमध्ये काकडीमध्ये गूळ व वड्याचे पीठ मिसळा. हे मिश्रण एकत्र मळा.नेहमीच्या इतर वड्यांप्रमाणेच काकडीचे वडेदेखील लहान लहान गोळे करून थापावेत आणि तळा.

 टीप- वडे थापताना चिकटू नयेत यासाठी वड्याचे पीठ थोडे जाडसर मळावे तसेच थापताना थोडा पाण्याचा हात लावावा

तांदळाची खीर रेसिपी

साहित्य- वाटीभर तांदूळ, पाणी, वाटीभर साखर / गूळ, जायफळ - वेलचीपूड, केशर, अर्धा लीटर उकळलेलं दूध

कृती- तांदळाची खीर पारंपारिक पद्धतीने बनवायची असेल तर तुम्हांला काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. याकरिता तांदूळ स्वच्छ धुवून घरी सावलीतच टॉवेलवर पसरून सुकवावेत. तांदूळ कोरडे झाल्यानंतर ते तूपाशिवाय कोरडे भाजावेत.तांदळाचा रंग बदलल्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर त्याची बारीक पूड बनवावी.भाजलेल्या तांदळाची भरड दूधात मिसळून उकळा.मंद आचेवर या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर मिसळावी. हे मिश्रण गॅसवर सतत ढवळत रहा. अन्यथा तळाला खीर लागू शकते. साखर दूधात विरघळली की त्यामध्ये केशर आणि जायफळ- वेलचीची पूड मिसळा.

 टीप- थेट वाफवलेला भात मिक्सरमध्ये लावा. तूपात गूळ वितळवून त्यावर भाताची पेस्ट परतून दूधात उकळा. यामध्ये किंचिंत मीठ टाका म्हणजे चव उत्तम येते.

असं म्हणतात की पितृपक्षाच्या कालावधीत यमराज सर्व मृत आत्म्यांना मुक्त करून आपल्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी भूतलावर धाडतो, यावेळी त्यांचा यथायोग्य सन्मान करून त्यांच्या आवडीचा नैवाद्य दाखवणे हा श्राद्धाचा मुख्य हेतू असतो. हा नैवैद्य वाडीच्या रूपात केळीच्या पानात भरून कावळा, गाय व कुत्र्याला देण्याची रीत प्रचलित आहे.