Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराज यांना 'रयतेचा राजा' करणारी ही 5 स्वभाव वैशिष्ट्यं प्रत्येकासाठी प्रेरणादायी!

या शिवजयंती निमित्त ही स्वभाववैशिट्यं तुमच्यामध्ये बिंबवण्यासाठी प्रयत्न करा.

Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीचा दिवस तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी तर तिथी प्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया दिवशी साजरा केला जातो. यंदा तिथीप्रमाणे शिवजयंतीचा (Shiv Jayanti) सोहळा काही शिवभक्त 10 मार्च दिवशी साजरा करणार आहे. शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यविरूद्धच्या लढ्यात जनतेमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी सुरू केली असली तरीही आजही शिवबाच्या पराक्रमांची गाथा अनेकांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच यंदाच्या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अशाच काही प्रेरणादायी स्वभाववैशिष्ट्यांना जाणून घ्या आणि त्यांची ही शिकवण पुढच्या पिढीला देखील द्यायला विसरू नका. नक्की वाचा: Shiv Jayanti Tithi Nusar 2023 Date: तिथीनुसार शिवजयंती कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या,तारीख .

शिवरायांची प्रेरणादायी स्वभाववैशिष्ट्यं

मूठभर मावळ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आक्रमणांना नामोहरण केले. पण यामध्ये त्यांच्या कुशल संघटनकौशल्याचा कायमच कस लागला. कोणत्याही मोहिमेमध्ये त्यांनी आपल्या मावळ्यांसोबत एकत्र राहून एकजुटीने शत्रूचा सामना केला. त्यामुळे त्यांच्या या 'मी' पेक्षा 'आम्ही' या सूत्राने अनेक लढाया सोप्या झाल्या. सोबतच मावळ्यांना मोहिमेवर जाताना केवळ उपदेश न देता सैन्याचं नेतृत्त्व देखील स्वतः मैदानामध्ये उतरून केल्याने त्यांनाही धीर मिळाला. ही सांघिक भावना त्यांना आजही महान राज्यकर्त्यांमध्ये नेते.

अनेकदा आपल्याला अपेक्षित असलेल्या निकालांसाठी नवनव्या मार्गांची वाट धरावी लागते. जुन्याच वाटा आपल्याला नव्या आणि मोठ्या मोठ्या ध्येयांपर्यंत कायम नेऊ शकणार नाहीत. त्यामुळे नवा निकाल नवी वाट चोखळण्याची हिंमत देखील दाखवण्याचं धैर्य वाढवणं गरजेचं आहे. अनेक पारंपारिक गोष्टींना छेद देत शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणत 'स्मार्ट वर्क' ची संकल्पना रूजवली आहे.

आव्हानांशिवाय मोठं यश अपेक्षित करणं शक्य नाही त्यामुळे आव्हानांचा विचार करून घाबरून जाण्यापेक्षा त्याला भिडून समोर येईल त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची इच्छाशक्तीचं अनेकदा निम्म यश मिळवून देण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे शिवरायांच्या स्वभावातील हा एक महत्त्वाचा गुण लहानपणापासूनच अंगिकारला पाहिजे.

मनुष्य हा समाजात एकत्र राहणारा प्राणी आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूला काही समविचारी आणि काही भिन्न मतप्रवाहांची लोकं असतात. पण या सार्‍यांसोबत जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी समोरच्यावर विश्वास ठेवण्याची सवय ठेवा. शिवरायांनी जेव्हा त्यांच्या साथिदारांना मोहिम दिली तेव्हा त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून मोहिम पूर्ण करण्याची जबाबदारी दिली होती. यामध्ये ते प्रक्रियेदरम्यान साथीदारांना टोकत नव्हते. यामुळे अनेकदा एकच काम पूर्णत्त्वाला नेण्याच्या अनेक विविध पर्यायांची आपल्याला जाण होते सोबतच ते काम टोकणं टाळल्याने करणार्‍यालाही भीती राहत नसल्याने मोकळीक राहते. त्यामुळे संघटन कौशल्य बांधताना समोरच्यावर विश्वास ठेवण्यालाही मोठं मन लागतं. शिवरायांनी ते कायम जपलं होतं.

शिवबा कालांतराने छत्रपती शिवाजी महाराज झाले तरी ते कायम हिंदवी स्वराज्यासमोर ते स्वतःला कधीही मोठं होऊ देत नव्हते. राज्यकर्ता म्हणून त्यांचा अहंकार कधीही स्वराज्यापेक्षा मोठा होणार नाही याची त्यांनी कायमच काळजी घेतली. म्हणून ते रयतेचे राजे होऊ शकले.

दरम्यान शिवबांचं सारं जीवनच खडतर प्रवासाचं असल्याने त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्याला नव्याने शिकण्यासारख्या असतात. या शिवजयंती निमित्त केवळ नाच-गाणी आणि डीजेच्या तालावर थिरकून हा दिवस साजरा करण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातील बहुमूल्य गुणांचा स्वतःमध्ये अवलंबन करून स्वतःसोबतच समाजातही सकारात्मकता निर्माण करण्यासाठी छोटा प्रयत्न करा.