Sankashti Chaturthi July 2020: संकष्टी चतुर्थी च्या दिवशी कशी कराल श्रीगणेशाची आराधना? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त
हे व्रत केल्याने विघ्नहर्ता गणेशा आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्यावर काही संकट आले असेल तर ते दूर करतो अशी गणेशभक्तांची मान्यता आहे. जुलै महिन्यातील संकष्टी आज आहे. ही संकष्टी चतुर्थी म्हणजे आपले मागणे देवापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.
Ganesh Chaturthi 2020: दर महिन्याला येणारे संकष्टी चतुर्थीचे (Sankashti Chaturthi) व्रत करणे हे फार शुभ मानले जाते. आपल्या लाडक्या गणरायाला वंदन करण्यासाठी त्याची मनोभावे पूजा करण्यासाठी अनेकजण हे व्रत करतात. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणा-या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. या दिवशी गणेशभक्त उपवास करतात आणि रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडतात. हे व्रत केल्याने विघ्नहर्ता गणेशा आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्यावर काही संकट आले असेल तर ते दूर करतो अशी गणेशभक्तांची मान्यता आहे. जुलै महिन्यातील संकष्टी आज आहे. ही संकष्टी चतुर्थी म्हणजे आपले मागणे देवापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.
संकष्टी चंद्रोदयाची वेळ: (Moon Rise TIme)
पंचांगानुसार, रात्री 10 वाजता चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे. तसेच या चतुर्थी तिथीला 8 जुलै सकाळी 9.18 मिनिटांनी प्रारंभ होणार असून 9 जुलै सकाळी 10.11 मिनिटांनी समाप्त होईल.
कसे कराल या दिवशी व्रत:
संकष्ट चतुर्थीचे व्रत करणा-याने या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करुन उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. आवश्यक वाटल्यास रात्री उपवास सोडण्याआधी पुन्हा आंघोळ करावी. नंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ अथवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यात "श्रीसंकष्टहर गणपतीची" स्थापना करावी. ( श्रीगणपतीची सोने, चांदी,तांबे वगैरे धातूची मूर्ती किंवा फोटो) त्याची षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणा-याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे. पूजेत वाहायचे "गंध-अक्षता-फ़ूल-वस्त्र" तांबड्या रंगाचे असावे.
त्यानंतर संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे. मग गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून गणेशाची आरती करावी आणि गणेशासमोर नतमस्तक व्हावे. त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. तुम्ही उपवास सोडत असल्या कारणाने जेवणात गोड पदार्थ आणि मोदक असावेत. जेवण आटोपल्यानंतर उत्तर पूजा करुन गणेशाची मूर्ती किंवा फोटो उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे.
आपल्या आयुष्यात आलेली आर्थिक, कौटुंबिक किंवा अन्य समस्या दूर होते आणि आपल्या घरातही सुख-शांती नांदण्यासाठी हे व्रत नित्यनियमाने करणे शुभ असते अशी अनेकांची श्रद्धा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2020 07:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

