Ram Navami 2024: रामनवमी निमित्त रामललांना चांदी आणि सोन्याची वस्त्र, सूर्य देव स्वतः करणार अभिषेक
रामललाना चांदी आणि सोन्याची वस्त्रे परिधान करण्यात येणार आहेत. सूर्य देव स्वतः अभिषेक करताना दिसतील.
Ram Navami 2024: यंदा अयोध्येत भगवान श्री रामांचा जन्मोत्सव भव्य पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष तयारी केली जात असून, त्यांच्या पूजेपासून ते सर्व कार्यक्रमांचे क्षण अविस्मरणीय बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेकडो वर्षांनंतर अशी भव्य आणि सुंदर तयारी रामनगरीत होताना दिसत आहे. रामनवमीच्या तयारीचे वर्णन करताना, श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, यावेळी रामनवमी निमित्त रामललांना चांदी आणि सोन्याच्या तारांनी विणलेले खास डिझायनर कपडे परिधान करणार आहेत. त्यांचे कपडे दिल्लीहून विमानाने आणले जाणार आहेत. तसेच मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आणि सजावटीसाठी खास प्रकारची फुले दिल्ली आणि कर्नाटकातून आणली जाणार आहेत. (हेही वाचा:Ram Navami 2024: रामनवमी निमित्त देशभरात जोरदार तयारी; देवरहा हंस बाबा मंदिराकडून अयोध्येला पाठवला जाणार 1,11,111 किलो लाडूंचा प्रसाद)
यावेळी भक्तिगीते गायली जाणार आहेत. वेद-पुराणांचे पठण केले जाणार आहे. प्रसादासाठी ५६ प्रकारचे खास पदार्थ तयार केले जाणार आहेत. भगवान सूर्य देखील आपल्या किरणांनी श्री रामांना अभिषेक करताना दिसतील.
पूजा अर्चक समितीचे सदस्य मिथिलेश नंदानी शरण यांनी सांगितले की, रामनवमीच्या उत्साहात तल्लीन झालेले रामभक्त गर्भगृहाचा पडदा हटल्यानंतर श्री रामललांचे दर्शन घेतील. तो क्षण अद्भूत असेल त्या वेळी सूर्याची किरणे रामललाच्या कपाळी पडणार आहेत. सूर्यदेव स्वतः त्यांना अभिषेक करतील.