Pride Month 2024: जगभरात 'प्राइड मंथ' म्हणून साजरा केला जातो जून महिना; LGBTQ+ लोकांसाठी आहे खास, जाणून घ्या इतिहास

ही अशी वेळ आहे जेव्हा लोक स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतात, आपलेपणा आणि आत्म-स्वीकृतीची भावना वाढवू शकतात.

Pride Month 2024 (Photo Credit : Pixabay)

Pride Month 2024: दरवर्षी जून महिना हा ‘प्राइड मंथ’ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. हा महिना विशेषतः LGBTQ+ समुदायातील लोक साजरा करतात. मात्र काही काळापासून इतर लोकही त्यात सहभागी होऊन एलजीबीटीक्यू+ लोकांना पाठिंबा देऊ लागले आहेत. जगभरात एलजीबीटीक्यू+ लोक ‘प्राइड मंथ’ हा विविध कार्यक्रम, परेडसह एक मोठा उत्सव म्हणून साजरा करतात. हा महिना या समुदायातील लोकांसाठी समान ओळख आणि जागरुकतेशी संबंधित आहे. तसेच आपल्या अस्तित्वाला समाजात समान वाटा मिळावा, जेणेकरून होणारा भेदभाव कमी करता येईल, हा देखील ‘प्राइड मंथ’ साजरा करण्याचा एक महत्वाचा उदेश आहे. प्राइड मंथ हा आपली ओळख स्वीकारून त्याला अभिमानाने जगासमोर प्रकट करण्याचा महिना आहे.

जाणून घ्या प्राइड मंथ का साजरा केला जातो-

वर्षे 1969 हे अमेरिकेच्या इतिहासातील एलजीबीटीक्यू+ लोकांसाठी एक टर्निंग पॉइंट म्हणून पाहिले जाते. प्राइड मंथची सुरुवात जून 1969 मध्ये न्यूयॉर्क शहरातील स्टोनवॉल दंगलीने झाली. 28 जून 1969 रोजी अमेरिकेतील मॅनहॅटन येथील स्टोनवॉल या समलिंगी क्लबवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी मोठी दंगल झाली. या छाप्यादरम्यान स्टोनवॉलचे मालक आणि तेथील इतर गे आणि लेस्बियन लोकांनी पोलिसांच्या हिंसक कारवाईला प्रत्युत्तर दिले. त्यांनी पुढे सहा दिवस प्रशासनाविरुद्ध निदर्शने आणि संघर्षांसह आंदोलन सुरू ठेवले.

जून 1969 नंतरच एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांनी विविध ठिकाणी आंदोलने केल्याने, जून महिना त्यांच्या अधिकारांसाठी एक ‘आवाज’ म्हणून पाहिला जातो. त्यानंतर हा महिना गे, लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर अधिकारांसाठी प्रतिकात्मक महिना म्हणून निवडला गेला. पुढे 1970 मध्ये दंगलीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक आंदोलकांनी स्टोनवॉलजवळील रस्त्यावर मिरवणूक काढली. हा पहिला 'प्राइड मंथ' मानला जातो. (हेही वाचा: All Eyes On Rafah Meaning in Marathi: 'ऑल आइज ऑन रफाह' म्हणजे काय? सोशल मीडियावर का टॉप ट्रेंड होतोय हा टॅग? वाचा सविस्तर)

प्राइड मंथ एलजीबीटीक्यू+ व्यक्तींना त्यांची ओळख स्वीकारण्याची आणि साजरी करण्याची संधी प्रदान करतो. ही अशी वेळ आहे जेव्हा लोक स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतात, आपलेपणा आणि आत्म-स्वीकृतीची भावना वाढवू शकतात. प्राइड मंथची सुरुवात जरी युनायटेड स्टेट्समध्ये झाली असली तरी, आता ती जागतिक मोहीम झाली आहे. भारतामध्येही मोठ्या उत्साहाने प्राइड मंथ साजरा केला जातो.