नवरात्रोत्सव 2018 : प्राचीन कोल्हापूरचा वारसा जपणाऱ्या 'नवदुर्गा'

नवदुर्गा कोल्हापूर (Photo credit : Lokprabha)

10 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम-रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला, महिषासुराचा वध केला म्हणून देवीचे महिषासुरमर्दिनी असे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. संपूर्ण भारतात देवीची अनेक शक्तीस्थळे आहेत. या नवरात्रात भाविक देवीच्या विविध स्थळांना भेटी देऊन मनोभावे देवीची पूजा-अर्चना करतात. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. तसेच मुंबईची मुंबादेवी, औंधची यमाई अशा अनेक ठिकाणी देवीची आराधना केली जाते. अंबाबाईसोबतच कोल्हापूर परिसरात देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. यांना एकत्रित नवदुर्गा असे संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गाचे आवर्जून दर्शन घेतलं जातं. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कोल्हापुरातील नवदुर्गा.

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात सर्वात महत्त्वाची आणि तितकीच प्राचीन गोष्ट म्हणजे करवीरनगरीच्या वेशीबाहेर असणाऱ्या ‘नवदुर्गा’. पूर्वी शहराला असणाऱ्या तटबंदीच्या बाहेर या दुर्गा होत्या. या तटबंदीच्या खुणा आपल्याला आजदेखील बिंदू चौकाच्या बाजूला पाहायला मिळतात. आता वाढलेल्या शहरामुळे या नवदुर्गा आपल्याला शहराच्या मध्यावरच पाहायला मिळतात, पण पूर्वी त्या तशा नव्हत्या. या नवदुर्गा शहराच्या बाजूने वसल्या आहेत. या नवदुर्गांचे दर्शन घेताना आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणाही पूर्ण होते.

नवरात्रीच्या काळामध्ये नागरिक या नवदुर्गांची यात्रा करतात. या यात्रेची सांगता मात्र दोन अशा देवींच्या दर्शनाने होते ज्यांचा समावेश नवदुर्गामध्ये होत नाही. त्यातील एक आहे त्र्यंबुली म्हणजेच टेंबलाई. शहराच्या पूर्वेला टेकडीवर त्र्यंबुली देवीचे मंदिर आहे. ही महालक्ष्मीची सेवेकरी मानली जाते. तर दुसरी आहे कात्यानी. कात्यानी ही शहराच्या दक्षिणेला आहे. कळंब्यापासून पुढे गेल्यावर कात्यानीचे मंदिर लागते.

(संदर्भ - ओंकार धर्माधिकारी, लोकप्रभा)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif