National Daughter's Day 2020: राष्ट्रीय कन्या दिवस यंदा कधी साजरा होणार? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास
सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो.
मुली या घराचं चैतन्य असतात. मुलगी घरात असल्याने घरातील वातावरण नेहमीच आनंदी आणि उत्साही राहते. प्रत्येक पालकांच्या मनांत त्यांच्या मुलीसाठी एक हळवा कोपरा असतो. तसंच मुलगी झाली की लक्ष्मी आली असं आपल्याकडं म्हटलं जातं. आई-वडीलांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येणाऱ्या या मुलींसाठी एक खास दिवस साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन (National Daughter's Day) साजरा केला जातो. यंदा हा दिवस 27 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. मुलींप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व, इतिहास आणि या संबंधित काही खास गोष्टी:
राष्ट्रीय कन्या दिनाचा इतिहास:
मुलगी हा परमेश्वराचा आशीर्वाद असतो, असे मानले जाते. त्यामुळे वर्षातील एक दिवस तिच्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. मुलींना ओझे मानले जाते. त्यामुळे काही देशांनी मुलींना समान अधिकार मिळण्यासाठी Daughter's Day राष्ट्रीय स्तरावर स्वीकारून तो साजरा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नागरिक, सरकार आणि कायद्यासमोर समना आहे. यासंदर्भात लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, विविध देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. भारतात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी कन्या दिन साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय कन्या दिनाचं महत्त्व:
आता मुलींनीही आपली क्षमता, सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात सिद्ध केलं आहे. परंतु, ग्रामीण भागात आजही मुलीचा जन्म फारसा आनंदात साजरा होत नाही. मुलगी ही कुटुंबावर ओझं असते, असेच मानले जाते. असे असले तरी समाजातील स्त्रीयांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे मुलीला वाढवताना कोणतीही वेगळी वागणूक मिळू नये किंवा दिली जावू नये. त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेऊन त्यांच्या प्रगतीसाठी पालकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे.
राष्ट्रीय कन्या दिन का साजरा केला जातो?
मुलींचे महत्त्व लोकांना पटावे, स्त्रीभृण हत्या थांबावी या प्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. स्त्रीभृण हत्येसोबतच घरगुती हिंसा, अत्याचार यांसारख्या अनेक घटना समाजात घडत असतात. राष्ट्रीय कन्या दिन साजरा करुन या समस्यांसंबंधितही जागरुकता निर्माण करणे, हा यामागील उद्देश आहे. तसंच मुलींना समान हक्क मिळवून देण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आई-वडील मुलींना खास गिफ्ट देतात. तसंच अनेकदा मुलींना छानसं सरप्राईज देऊन खूश केले जाते. मुलींचे पालकांच्या आयुष्यातील स्थान, महत्त्व सांगणारा हा दिवस अनेक मुलींच्या आयुष्यात आनंद आणतोय