Guru Purnima 2019: आदर्श गुरु शिष्यांच्या या 5 जोड्या आहेत जगात भारी
चला तर मग याच निमित्ताने अशाच गाजलेल्या गुरु शिष्याच्या जोड्यांविषयी जाणून घेऊयात
आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा(Guru Purnima) म्हणून ओळखले जाते, पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु हा आपल्या शिष्याला ज्ञानरुपी प्रकाश देत असतो, अशा या गुरूच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा. भारतवर्षात आपण अगदी पौराणिक कथांपासून अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या पहिल्या आहेत, यातील, द्रोणाचार्य- एकलव्य ,सांदिपनी ऋषी- श्रीकृष्ण, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य या जोड्या नेहमीच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. या कथा जरी पुराणातल्या असल्या तरी अलीकडच्या काळातही अशाच काही आदर्श गुरु शिष्याच्या जोड्या जगात चर्चिल्या गेल्या आहेत.
यंदा 16 जुलैला सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. चला तर मग याच निमित्ताने अशाच गाजलेल्या गुरु शिष्याच्या जोड्यांविषयी जाणून घेऊयात..
1)रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर
गुरु शिष्याच्या आदर्श जोडीचा विचार करताच सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर या जोडीचे नाव सर्वात आधी घेतले जाते. सचिनला क्रिकेट विश्वात देवाची पदवी दिली जाते, आणि रमाकांत आचरेकर हे या देवाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कात कोच आचरेकरांनी सचिनला दिलेल्या क्रिकेटच्या धड्यांमुळे आज भारतालाच नव्हे तर जगाला एक मास्टर ब्लास्टर क्रिकेटर पाहता आला असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही.याशिवाय आचरेकर यांनी विनोद कांबळी याला सुद्धा क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. अलीकडेच आचरेकर यांचे निधन झाले त्यावेळी सचिनने स्वतः त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता, यावरून त्यांच्या मैदानाच्या पलीकडील नात्याचा अंदाज येतो.
2)पंडित बिरजू महाराज - माधुरी दीक्षित
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही आपल्या कसदार अभिनयासोबतच लक्षवेधी नृत्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.आजवरचे अनेक चित्रपट माधुरीच्या डान्स स्टेप्स मुळे हिट झाले आहेत. पण या सुंदर नृत्यांगनेच्या जडणघडणीत पंडित बिरजू महाराज यांचा मोलाचा वाटा आहे. माधुरीने पंडितजींकडे कत्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण घेतले आहे, यामुळे आपल्याला अभिनयात मोठी मदत झाल्याचे तिने अनेकदा बोलूनही दाखवले आहे. अलीकडेच एका रिऍलिटी शो मध्ये पंडितजी आणि माधुरी यांच्या नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळाली होती, यानंतर आता माधुरीच्या ऑनलाईननृत्य प्रशिक्षण वर्गात पंडितजी कत्थकचे धडे देणार असल्याचे देखील म्हंटले जात आहे.
3)पुल्लेला गोपीचंद - पी. वी. सिंधू
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये रौप्य पदक मिळवून देणारी फुलराणी पी वी सिंधू हिला प्रसिद्ध बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी खेळाचे पाठ दिले आहेत. 'खेळात भाग घेण्यासाठी फक्त पदकाचेच लक्ष्य समोर असावे लागत नाही. पदके सर्वस्व नाहीत. खेळात येण्याच्या अनेक करणांपैकी पदके हे एखादे कारण असू शकेल. तेव्हा आधी खेळणे खूप महत्त्वाचे आहे', अशा विचाराचे गोपीचंद यांनी सायना नेहवाल, सिंधू, कश्यप, श्रीकांत, प्रणॉय असे सरस खेळाडू घडवले आहेत. याशिवाय गपिचंद हे स्वतः भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रमुख प्रशिक्षक आणि माजी ऑल इंग्लंड विजेते बॅडमिंटनपटू आहेत.
4)श्रीनिवास खळे- शंकर महादेवन
दोन संपूर्ण वेगळ्या बाजाच्या संस्कृतीतून आलेल्या लोकांना कला एकत्र आणते या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीनिवास खळे व शंकर महादेवन यांची जोडी. शंकर महादेवन हे आज संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आहे, पण खळे काकांच्या सानिध्यात त्यांच्या करिअरची खरी सुरवात झाली. लता मंगेशकर यांच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी खळे यांना एका वीणा वादकाची गरज होती तेव्हा महादेवन त्यांच्या ओळखीत आले. यावेळी बाल वयातील महादेवन यांचे कौशल्य ओळखून खळे काकांनी त्याला प्रशिक्षण देण्यास सुरवात केली, त्यांच्या सोबत राहिल्याने मूळचे दक्षिण भारतीय असूनही महादेवन हे मराठीत सुद्धा गाऊ लागले. श्रीनिवास खळे यांच्या निधनानंतर महादेवन यांनी त्यांच्या कुटुंबाची देखील बरीच काळजी घेतली आहे.
5)नीम करोरी बाबा-मार्क झुकरबर्ग
असं म्हणतात, की फेसबुक या आघाडीच्या सोशल मीडिया साईटचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग हा एकेकाळी अस्वस्थतेमुळे फेसबुक विकायला निघाला होता, मात्र त्यावेळी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांना अध्यात्मिक नीम करोरी बाबा यांच्याकडे मनः शांती साठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मार्क याने भारतात येऊन ध्यानसाधना केली होती व त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बराच सकारत्मक बदल घडला. हा किस्सा जरी खोटा वाटत असला तरी एकेकाळी याची बरीच चर्चा होती.Guru Purnima Gift Ideas: यंदाची गुरूपौर्णिमा खास करतील अशा गुरूंसाठी '5' बजेट फ्रेंडली गिफ्ट आयडियाज
हे काही समकालीन गुरु शिष्य आपल्याला आयुष्यात गुरुचे महत्व पटवून देतात, याशिवाय सुरवातीला ज्या नात्यात एक आदरपूर्वक भीती असायची त्याच नात्यात अलीकडे प्रेमळ व घरगुती जवळीक आल्याने बदलले स्वरूप सुद्धा समोर येते.