Gauri Ganpati Visarjan 2020 Puja Timing: गौरी गणपती विसर्जनाची मुहूर्त वेळ, पूजा विधी जाणून घेत पहा यंदा घरच्या घरी कसा द्याल बाप्पाला निरोप!

दरम्यान यंदा गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर पुढल्या वर्षी गणपती बाप्पा 10 सप्टेंबर 2021 दिवशी येणार आहे.

Ganpati (Photo Credits: rupixen from Pixabay)

Gauri Ganpati Visarjan 2020 Puja Vidhi Muhurat:  महाराष्ट्रामध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (Ganesh Chaturthi) गणपती बाप्पाचं आणि त्यापाठोपाठ काही घराअंमध्ये गौराईचं आगमन (Gauri Aavahan) होतं. पारंपारिक रितीभातींप्रमाणे गौरी-गणपतींचं पूजन झाल्यानंतर मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन करण्याची पद्धत आहे. यंदा घरगुती गौरी-गणपतींचं विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) 27 ऑगस्ट दिवशी होणार आहे. 5-6 दिवस बाप्पाची पूजा केल्यानंतर तितक्याच मनोभावे बाप्पाला निरोप देण्याची रीत आहे. शास्त्रोत्र पूजा- पाठ केल्यानंतर बाप्पाचं आणि गौराईचं पाणवठ्यावर, समुद्रात किंवा तलावामध्ये विसर्जन करण्याची पद्धत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरच्या घरी किंवा सोसायटीमध्ये एकत्रितपणे कृत्रिम तलावं उभारून विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेकडून विशेष सोय देखील करण्यात आली आहे.

यंदा तुम्ही घरच्या घरी पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करू शकता. बाप्पाच्या आगमनाला जशी धूम असतेतशीच विसर्जनाला असते. बाप्पाला शिदोरीसाठी प्रसाद बांधून दिला जातो.

गौरी गणपती विसर्जनाची तारीख-वेळ

गौरी गणपतींचं विसर्जन यंदा 27 ऑगस्ट, गुरूवारी आहे. दुपारी 12.36 पासून बाप्पाचं विसर्जन करता येऊ शकतं.

गौरी गणपती विसर्जन पूजा विधी 

गणपती बाप्पाला विसर्जनाला नेण्यापूर्वी घरातील सारी मंडळी एकत्र जमून बाप्पाची आरती करतात. बाप्पासोबत दही -भाताचा नैवेद्य आणि गोडाचा पदार्थ दिला जातो. बाप्पा स्थापन केलेल्या जागेपासून हलवून इतरत्र ठेवला जातो. त्यानंतर विसर्जनाच्या स्थळी निरोपाची आरती करून अक्षता-फूलं वाहून, अगरबत्ती ओवाळून बाप्पाला अखेरचा निरोप देत पुढल्या वर्षी लवकर या असं आवाहन केलं जातं.

यंदा घरच्या घरी बादली, टब किंवा कृत्रिम तलावांमध्येही गणेश मूर्ती विसर्जित केली जाऊ शकते. मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर काही माती घेऊन बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होता तेथे बाप्पाची पुन्हा आरती करून प्रसाद वाटला जातो. गौराईच्या मुखावट्यालादेखील तसाच निरोप दिला जातो. यंदा दरवर्षी प्रमाणे  बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूका नसतील. ढोल  ताशा- पथकांची रेलचेल नसेल. नागरिकांना कमीत कमी लोकांमध्ये सार्वजनिक स्थळी गणपती बाप्पाचं विसर्जन करता येणार आहे.

दरम्यान यंदा गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर पुढल्या वर्षी गणपती बाप्पा 10 सप्टेंबर 2021 दिवशी येणार आहे.