Gauri Avahan 2019: गौरी आवाहन करण्यासाठी जाणून घ्या तारीख, वेळ आणि पुजा विधी
गौरी आवाहन निमित्ताने गौरी मातेचे आगमन होते. यामुळे सुरू असलेला गणेशोत्सव आणखीनच प्रकाशमय होतो. विवाहित स्रियांसाठी हा जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण असल्याचे म्हटले जाते. तर ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते.
Gauri Avahan 2019 Date, Time, Puja: गौरी माता म्हणजेच साक्षात माता पार्वतीचे रूप. गौरी आवाहन निमित्ताने गौरी मातेचे आगमन होते. यामुळे सुरू असलेला गणेशोत्सव आणखीनच प्रकाशमय होतो. विवाहित स्रियांसाठी हा जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण असल्याचे म्हटले जाते. तर ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. तर यंदा गौरी आवाहन (Gauri Avahan) येत्या 5 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
प्रत्येकजण परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणली जाते. त्यानंतर, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आहे.
-द्रिक पंचांग यांनी सांगितल्याप्रमाणे गौरी आवाहनाची वेळ आणि तारीख:
>>जेष्ठा गौरी आवाहन तारीख: 5 सप्टेंबर (गुरुवार)
>>वेळ: सकाळी 6.05 मिनिट ते सायंकाळी 6.34 मिनिट
गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती:
-स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात.
-काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.
-तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात.ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे.आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते.विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात.
-आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात.कोणी
-धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडण्याची पद्धती आहे.(Ganesh Chaturthi Flower Decoration Ideas: यंदा गणपतीची आरास आकर्कष फुलांच्या मदतीने करण्यासाठी खास डेकोरेशन आयडियाज)
तसेच गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते. या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा करत फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचसोबत तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. परंतु गौरी विसर्जनापूर्वी दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते असे मानले जाते.