Eid 2019 Special Phirni Recipe: नात्यांमध्ये गोडवा आणणारी मुस्लिम पद्धतीची फिरनी एकदा चाखाच, पाहा रेसिपी

मुस्लिम पद्धतीने कशी बनविली जाते ही फिरनी

phirni (Photo Credits: File Photo)

5 जूनला येणा-या रमजान ईद (Ramadan 2019)  ची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत असून त्याची तयारीही जोरदार सुरु आहे. सर्व बाजारपेठा रोषणाईने सजल्या असून नानाविध खाद्यपदार्थही पाहायला मिळत आहेत. या दिवसात मुंबईतील मोहम्मद अली रोडवरचे (Mohammad ali road) खाद्यपदार्थ चाखण्याची मजाच काही और असते. येथे सर्व जातीय, धर्मीय लोक एकत्र येऊन येथील स्वादिष्ट अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. पण ज्यांना आपल्या कामकाजामुळे जाता आले नाही, अशा खवय्यांसाठी आम्ही आज एक विशेष रेसिपी सांगणार आहोत. रमजान ईद ला शीर खुरम्यासह आणखी एक गोड, स्वादिष्ट पदार्थाचे नाव घेतले जाते ती म्हणजे 'फिरनी'(Phirni). आजपर्यंत आपण अनेक मिठाईवाल्यांच्या दुकानात, हॉटेलात ही फिरनी चाखली असेल. पण मुस्लिम पद्धतीने बनविलेल्या फिरनीच चवच काही और आहे. चला तर मग पाहूया मुस्लिम पद्धतीने कशी बनविली जाते ही फिरनी...

साहित्य:

सर्वात आधी आपण ड्रायफ्रूटची पेस्ट कशी बनवायची ते पाहूयात.

काजू, बदाम(वरची साल काढून), सुकं खोबरं (वरची काळी साल काढून) 2 तास भिजत ठेवणे

त्यानंतर ह्या तीनही गोष्टी एकजीव करुन त्याची बारीक पेस्ट करुन घेणे

आता तांदळाची पेस्ट कशी बनवायची पाहूयात.

100 ग्रॅम तांदूळ 2 तास भिजत ठेवणे. 2 तासानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन पाणी गाळून घेणे. त्यानंतर त्यात 3 वेलची आणि थोडं पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करुन घेणे.

आता वळूयात मूळ पाककृतीकडे:

1. सर्वात आधी गॅसवर 1 लिटर दूध तापवत ठेवणे

2. त्यानंतर 300 ग्रॅम साखर थोडी थोडी करुन दूधात टाकत राहणे

3. ते करत असताना हे दूध ही चमच्याने ढवळत राहा, जेणेकरुन गठ्ठे होणार नाही.

4. सर्व साखर त्या दूधात एकजीव केल्यानंतर त्यात सर्वप्रथम तांदळाची तयार केलेली पेस्ट टाकावी.

5. त्यानंतर ते मिश्रण सतत ढवळत राहणे.

विशेष टीप:फिरनी बनवताना दुधात गठ्ठे होऊन देण्यासाठी विशेष काळजी घ्यावी

6. तांदळाची पेस्ट दुधात एकजीव केल्यानंतर त्यात तयार केलेली ड्रायफ्रूट्सची पेस्ट दुधात टाकणे.

7. ड्रायफ्रूट्सची पेस्ट टाकल्यानंतर पुढील 15 मिनिटे हे मिश्रण ढवळत राहणे

8. त्यानंतर शेवटी गॅस बंद करून तयार मिश्रणात खिसलेले बदाम, काजू, खिसलेले सुकं खोबरं आणि थोडी चारोळी वरुन टाकावी.

झाली फिरनी तयार.

फिरनी बनविण्यासाठी साधारण 30 ते 40 मिनिटे लागतात. तसेच ड्रायफ्रूट्स आणि तांदळाची पेस्ट बनविण्यासाठी साधारण 2 तास लागतात. हे खरं आहे की, फिरनी बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र त्याची चवही तितकीच मधुर, गोड असते हे नाकारताही येणार नाही. आणि असं म्हणतात की, 'सब्र का फल मीठा होता है'. मग जर हे मिठे फळ चाखून बघायचे असेल, तर ही फिरनी रेसिपी एकदा करुन पाहाच.