एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना नरेंद्र मोदी यांचे सडेतोड उत्तर; जवानांच्या पराक्रमावर शंका का उपस्थित केली जात आहे?
जवानांच्या पराक्रमावर शंका उपस्थित केली जात आहे असे नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे.
पुलवामा हल्ला झाला, भारताचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर बदला घेण्यासाठी मोदी सरकारने एअर स्ट्राईक करून बालकोट येथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. सरकारच्या आणि भारतीय वायुसेनेच्या या कार्याचे प्रचंड कौतुक झाले. मात्र विरोधकांकडून याबाबत प्रश्नचिन्हे निर्माण झाली. खरच हे दहशवादी तळ नष्ट झाले का? खरेच यात दहशतवादी मारले गेले का? याबाबत सरकारकडे अनेक नेत्यांनी पुरावे मागितले, मात्र याबाबत सरकारने कोणीतीही माहिती दिली नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचा पुरावा मागणाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. जवानांच्या पराक्रमावर शंका उपस्थित केली जात आहे असे नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाटणा, बिहार येथे नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. 'विरोधक एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. आपल्या वीर जवानांनी जो पराक्रम गाजवला आहे, त्यावर शंका उपस्थित करत आहेत. अशा प्रकारे पुरावे मागून काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आपल्या जवानांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहेत?’ (हेही वाचा: Surgical Strike 2: भारतीय वायूसेनेकडून पाकिस्तानच्या रिकाम्या तळावर हल्ला-ओमर अब्दुला)
‘अमेरिकेने दहशतवादी लादेनचा खात्मा केल्यानंतर याचे पुरावे दिले होते, त्याप्रमाणे सॅटेलाईटद्वारे मिळणाऱ्या फोटोंच्या सहाय्याने आपणही एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत', असे दिग्विजय सिंह म्हणाले होते. त्याचसोबत ममता बॅनर्जी, शरद पवार यांनीदेखील खातमा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादी मागितली होती. यावर विरोधक अशी वक्तव्य का करत आहे ज्यामुळे देशाच्या दुश्मनांना फायदा होईल ? असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला आहे.