निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी मिळणार? केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध विभागांकडून मागवल्या सूचना
यासाठी गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडे (सीएपीएफ) या प्रकरणी विस्तृत अहवाल मागितला आहे.
पुरुष आणि महिला यांच्यासोबत आता तृतीयपंथीयांनाही निमलष्करी दलांमध्ये (Paramilitary Forces) संधी देण्याचा विचार गृह मंत्रालयाकडून (Union Home Ministry) अतिशय गांभीर्याने सुरू आहे. यासाठी गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडे (सीएपीएफ) या प्रकरणी विस्तृत अहवाल मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निवड प्रक्रियेत आवश्यक बदल केले जातील. त्यानंतर गृह मंत्रालय यासंबंधीचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेच्या नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
गृह मंत्रालयाला निमलष्करी दलांनी सकारात्मक अहवाल दिल्यास चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर तृतीयपंथी अधिकारी तैनात होण्याची शक्यता आहे. आयटीबीपी, बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफ यांचा समावेश निमलष्करी दलांमध्ये होतो. हे सर्व विभाग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. देशांतर्गत महत्त्वाच्या भागांसह सीमावर्ती भागात या विभागांचे जवान महत्त्वाची कामगिरी बजावतात.आयटीबीकडे भारत-चीन सीमेची जबाबदारी आहे. याशिवाय पाकिस्तान सीमेवरही तृतीयपंथीय अधिकारी कर्तव्य बजावताना दिसतील. देशातील नक्षलग्रस्त भागांची जबाबदारीदेखील त्यांच्याकडे सोपवण्यात येईल, अशीही माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडे (सीएपीएफ) या प्रकरणी विस्तृत अहवाल मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निवड प्रक्रियेत आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली. हे देखील वाचा- UPSC Exams 2020: यूपीएससी च्या पूर्व, मुख्य परीक्षा देणार्यांना परीक्षा केंद्रामध्ये बदल करता येणार; upsconline.nic.in वर अशी आहे प्रक्रिया
एएनआयचे ट्विट-
तृतीयपंथीयांना निमलष्करी दलांमध्ये संधी दिली, तर हा ऐतिहासिक निर्णय मानला जाईल. इतर क्षेत्रात तृतीयपंथी नोकरी करत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, निमलष्करी दलात तृतीयपंथीयांसाठी पहिल्यांदाच मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.