उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे अपघाताचा प्रयत्न? रुळांवर आढळला लाकडी ओंडका; घटनेत मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज
6 किलो लाकडाचा रुळांवर आढळला. परिणामी लखनौ-हरदोई रेल्वेचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा रेल्वे अपघाताचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री एका पॅसेंजर ट्रेनने रुळांवर ठेवलेल्या जाड लाकडाच्या ओंडकाला धडक दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळील ट्रॅकवर रिकामे गॅस सिलिंडर सापडल्याच्या घटनेच्या एका महिन्यानंतर ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला उडविण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर 10 डिटोनेटर सापडले होते.
दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक 14236 बरेली-वाराणसी एक्सप्रेस 6 किलोपेक्षा जास्त वजनाच्या लाकडाच्या दोन फूट लांब ओंडकाला धडकली. त्यानंतर काही अंतरापर्यंत ट्रेनने लाकडाच्या तुकड्याला खेचत नेले. अपघातानंतर लोको पायलटने ट्रेन सुरक्षितपणे थांबवली. या घटनेमुळे ट्रॅकवरील सिग्नलिंग यंत्रनेत बिघाड झाला.
मलिहाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक तपासणी पथक रवाना करण्यात आले आहे. तपासणी पथक आणि लोको पायलटनी मोठ्या प्रयत्नाने लाकूड रेल्वेच्या चाकांतून बाहेर काढले. यामुळे दोन तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
मध्य प्रदेशातील सागफाटा रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर डिटोनेटर सापडल्याची घटना सप्टेंबरमध्ये घडली होती. जम्मू-काश्मीरहून कर्नाटकला जाणाऱ्या लष्कराच्या विशेष ट्रेनला लक्ष्य करण्यात आले होते. ट्रेन डिटोनेटर्सवरून जात असताना स्फोट झाल्यामुळे लोको पायलट सावध झाला आणि त्याने तातडीने ट्रेन थांबवली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नव्हते.