आंध्र प्रदेशच्या विधानसभेची इमारत ठरणार Statue Of Unity पेक्षा उंच

आंध्र प्रदेश विधानसभेची नवीन इमारत ही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ही इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर हे जगातील सर्वात उंच बांधकाम ठरणार आहे

आंध्र प्रदेश विधानसभेच्या इमारतीचे डिझाईन (Photo credit : twitter)

सध्या स्वतःचे बळकट स्थान, आपली ताकद जगाला दाखवण्यासाठी उंच इमारती बांधण्याचा सपाटा सुरु आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (statue of unity)मुळे कित्येकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या, त्यानंतर राजस्थानमध्ये सर्वात उंची शिव मूर्ती आकार घेत असल्याचे वृत्त आले. आता यात स्वतःला सिद्ध करण्यास आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूदेखील पुढे सरसावले आहेत. भाजपवर नाराज असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी, आंध्र प्रदेश विधानसभेची नवीन इमारत ही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर हे जगातील सर्वात उंच बांधकाम ठरणार आहे.

आंध्र प्रदेशच्या अमरावती येथे ही विधानसभेची नवीन इमारत बांधली जाणार असून, या नवीन इमारतीच्या डिझाईनबाबत स्वतः चंद्राबाबू नायडू हे निर्णय घेणार आहेत. यूके स्थित आर्किटेक्ट नोर्मा फॉस्टर यांचे हे डिझाईन असून, ही नवी इमारत स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षा 68 मीटर उंच असणार आहे. तीन मजल्याच्या या असेंब्ली इमारतीचे टॉवर 250 मीटर इतक्या उंचीचे असेल, जे की गुजरातमध्ये बांधलेल्या 182 मीटरच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच ठरणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस या संदर्भात निविदा मागवण्यात येतील आणि त्यानंतर 2 वर्षांत हे बांधकाम पूर्ण होईल.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये उभारला आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 201 मीटर उंच रामाची मूर्ती उभारण्याचा निर्णय घेतला. याच पावलावर पाऊल ठेऊन कर्नाटक सरकारने 38.1 मीटर उंच कावेरी मातेचा पुतळा उभा केला जाणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातही शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा उभा केला जाणार होता मात्र त्याची उंची आता 7.5 मीटरने कमी केली आहे.