Reliance Foundation गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू करणार 1000 बेडचं कोविड सेंटर; कोरोनाबाधित रुग्णांवर होणार विनामूल्य उपचार

पुढच्या आठवड्यात 400 खाटांचा पहिला टप्पा तयार होईल. त्यातून पुढच्या एका आठवड्यात आणखी 600 बेड तयार होतील. हे रुग्णालय मोफत दर्जेदार सेवा देण्यास सक्षम असेल.

Nita Ambani | (Photo Credits: Twitter/ANI

कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा परिणाम संपूर्ण देशाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांवर झाला आहे. परंतु त्यादरम्यान, सरकार तसेच अनेक खाजगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था कोविड संक्रमित रूग्णांच्या उपचारासाठी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यात गुंतल्या आहेत. दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशन (Reliance Foundation) ने गुजरातमधील जामनगरमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारे 1000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे. या रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार सुविधा मिळणार आहेत.

फाउंडेशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामनगरमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील आठवड्याभरात 400 खाटांची कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल. त्यानंतर, येत्या दोन आठवड्यांत जामनगरमध्येचं 600 खाटांचे केंद्र बांधले जाईल. (वाचा -भारतात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट! गेल्या 24 तासात 3,79,257 रुग्ण, तर 3645 जणांचा मृत्यू)

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी सांगितले की, “भारत सध्या कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. यादरम्यान, आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहोत. आरोग्याशी संबंधित अतिरिक्त सुविधा ही काळाची गरज आहे. ''

दरम्यान, रिलायन्स फाउंडेशन जामनगरमध्ये कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजनसह 1000 खाटांचे रुग्णालय बनवित आहे. पुढच्या आठवड्यात 400 खाटांचा पहिला टप्पा तयार होईल. त्यातून पुढच्या एका आठवड्यात आणखी 600 बेड तयार होतील. हे रुग्णालय मोफत दर्जेदार सेवा देण्यास सक्षम असेल.