Rajasthan Assembly Election 2018: राजस्थानमध्ये शिवसेनेचा बाण करणार भाजपला घायाळ? आदित्य ठाकरे प्रचारात सक्रीय
उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: आदित्य ठाकरे रासस्थानला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक निवडणुक शिवसेना राजयीकदृष्ट्या गांभीर्याने घेत आहे.
Rajasthan Assembly Election 2018: प्रादेशिक राजकीय पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने आपला मराठी बाज सोडत राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करत शिवसेना ( ShivSena) सक्रीय होत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक निवडणुक शिवसेना राजयीकदृष्ट्या गांभीर्याने घेत आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीतही (Rajasthan Assembly Election) शिवसेना मैदानत उतरली असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aditya Thackeray) थेट रिंगणात आहेत. आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे मंडळही राजस्थानमध्ये शिवसेनेचा प्रचार करत आहेत.
अर्थात राजस्थानमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. त्यामुळे नवख्या शिवसेनेला तिथे किती जनाधार मिळतोय हे प्रत्यक्ष निकालानंतरच समजणार असले तरी, भाजपसाठी विद्यमान स्थिती आणि भविष्यासाठी धोक्याचा इशारा ठरु शकतो. कारण, हिंदूत्त्व हा या दोन्ही पक्षांचा मूळ अजेंडा आहे. त्यामुळे भविष्यात हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय स्तरावर शिवसेना-भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, सध्यास्थितीत हिंदुत्त्वावादी शिवसेनेचा बाण भाजपला राजस्थानमध्ये घायाळ करणारा ठरु शकतो का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ३८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार (Shiv Sena Candidates in Rajasthan) उभे केले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: आदित्य ठाकरे रासस्थानला पोहोचले आहेत. त्यांनी शिवसेना उमेदवार पन्नालाल सोळंखी यांच्यासाठी आयोजित यांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत सहभाग घेतला. या वेळी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या राजस्थान दौऱ्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. (हेही वाचा, तेलंगणामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार?)
दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ३८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांसाठी येत्या 7 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. तर, त्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 2294 उमेदवार जनतेचा कौल आजमावणार आहेत. त्यात भाजपचे 200, काँग्रेस 135, बसपा 190, आम आदमी पक्ष 142 उमेदवारांसह असे इतर एकूण 88 राजकीय पक्ष,संघटनांचे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या आहे तब्बल 4.74 कोटी. अपक्ष उमेदवार संख्या आहे 840, तर 20 राजकीय पक्ष असे आहेत ज्यांनी केवळ एकच उमेदवार रिंगणात उतरवला आहे. 15 राजकीय पक्षांनी केवळ 2 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर 34 राजकीय पक्ष असे आहेत जे 3 ते 20 जागांवर आपले नशीम आजमावत आहेत.