PM Narendra Modi यांच्याकडून पुढील आठवड्यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रो चं लोकार्पण होण्याची शक्यता; विधानसभेसाठी प्रचाराचाही नारळ फूटणार?
या भेटीमध्ये पुण्यात ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रो ला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election) तारखांच्या घोषणांची प्रतिक्षा आहे. येत्या काही दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येणार आहेत. ते दोन दिवसांच्या दौर्या दरम्यान महायुतीच्या निवडणूक कॅम्पेनची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 सप्टेंबर दिवशी पुण्याला भेट देणार आहे. या भेटीमध्ये पुण्यात ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मेट्रो ला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे. तसेच या मेट्रोचा पुढे स्वारगेट ते कात्रज असा होणार्या विस्ताराचं देखील भूमीपूजन केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड ते निगडी या मार्गावरही कामाचे भूमीपूजन होईल.
Indian Express च्या वृत्तानुसार सिव्हिल ऑफिसरने दिलेल्या माहितीप्रमाणे, "आम्हांला उद्घाटनासाठी आणि दोन मार्गांवर विस्तारीकरणासाठी तयारीच्या सूचना मिळाल्या आहेत. मात्र यामध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे कन्फर्मेशन नसल्याचे त्यांनी सांगितले आहे."
भाजपा नेत्यांच्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये 26, 27 पैकी एका दिवशी बैठक होऊ शकते. यामध्ये आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र येऊन निवडणूकांसाठी प्रचाराचा नारळ वाढवला जाऊ शकतो. दरम्यान यावेळी पुण्यात एसपी कॉलेजच्या मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 27 नोव्हेंबर दिवशी संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात दिवाळी नंतर विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. नवरात्र, दसर्याचा मुहूर्त साधत महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एनसीपीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहे. कोविड संकटानंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना, एनसीपी पक्षामध्ये उभी फूट पडली आणि भाजपा सोबत येत त्यांनी नवं सरकार स्थापन केलानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.