Navneet Rana Death Threat : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानमधून व्हॉटसअॅपवर पाठवली ऑडिओ क्लिप
या प्रकरणी त्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशी करण्याची मागणी केली आहे. व्हॉटसअॅपवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.
Navneet Rana Death Threat : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी ( Navneet Rana Death Threat)मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आल्याचे सांगितले जात आहे. ३ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास नवनीत राणा यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्याशिवाय, या प्रकरणी ‘एमआयएम’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (MIM MP Asaduddin Owaisi) यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, आता या धमकी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. (हेही वाचा : Navneet Rana On Nitish Kumar: माफी नको राजीनामा द्या, नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांचा संताप )
नवनीत राणा यांना व्हॉटसअॅपवर ऑडिओ क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशाला उडवून देण्याची धमकी त्यात दिली. या प्रकरणी नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्याक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन मेसेज पाठवणाऱ्या विरोधात कलम 354 A,354 D,506 (२), 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ऑडिओ क्लीप पाठवल्यानंतरही त्याच नंबरवरुन राणा यांना व्हॉट्सअप व्हाईस कॉल आला होता. मात्र, तो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ऑडिओ क्लीप आली. त्यावेळी, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच नाव या ऑडिओ क्लीपमध्ये घेण्यात आले. अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही वाट लावू शकतो. आम्ही ठरवलं तर क्षणात काहीही करु शकतो, अशी धमकी देण्यात आली. (हेही वाचा : Navneet Rana Photo Session: नवनीत राणा यांच्या फोटोसेशनमुळे लीलावती रुग्णालय प्रशासन अडचणीत, शिवसेना नेत्यांकडून प्रश्नांची सरबत्ती )
नवनीत राणा यांना आलेल्या धमकीची गृहविभागाने गंभीर दाखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. खासदार नवनीत राणा यांनी धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी ओवीसी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभेमध्ये खासदार ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अनेकदा ओवैसींच्या कार्यकर्त्यांच्या धमक्या आल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी ओवैसी यांची चौकशी केल्यावर त्यांची आणि धमकी देणाऱ्यांची काही लिंक आहे काय? हे लवकरचं बाहेर येईल. या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले आहे.