Lok Sabha Election Result 2019: निवडणूकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी पाहावी लागणार शुक्रवार पहाटेपर्यतची वाट?
23 मे ला निकाल जाहीर होत असले तरीही या निवडणूकीचा संपुर्ण निकाल हाती येण्यासाठी शुक्रवार पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
संपूर्ण देशाचे ज्या निकालाकडे लक्ष लागलय तो लोकसभा निवडणूकीचा निकाल हाती येण्यास आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. 23 मे ला निकाल जाहीर होत असले तरीही या निवडणूकीचा संपुर्ण निकाल हाती येण्यासाठी शुक्रवार पहाटेपर्यंतची वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. ह्याचे मुख्य कारण म्हणजे यावेळी व्हीव्हीपॅट यंत्रातील मतांची पडताळणी होणार आहेत. त्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल असे सांगण्यात येतय.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएममधील मतांची मोजणीस सुरुवात होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतांची पडताळणी केली जाणार आहे. ईव्हीएममधील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाईल. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास वेळ लागू शकतो. मात्र नेमका किती वेळ लागणार, याबाबत जिल्हाधिकारीही संभ्रमात आहेत.
प्रत्येक फेरीतील मतमोजणीनंतर आघाडीवर कोण आणि पिछाडीवर कोण हे स्पष्ट होईल. मात्र व्हीव्हीपॅटमधील स्लिपची पडताळणी केल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर केला जाणार नाही, असे अधिका-यांकडून सांगण्यात येतय. त्यामुळे कदाचित ह्या संपुर्ण प्रक्रियेला थोडा जास्त कालावधी लागणार असल्यामुळे कदाचित शुक्रवारची पहाट उजाडू शकते.
देशात पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान झाले.
तर महाराष्ट्रात 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल या चार दिवसात चार टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 19 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान झाले.