Assembly Elections Results 2018: राम मंदिर सोडा, विकासाच्या मूळ मुद्द्याकडे परत फिरा: खा. संजय काकडे
त्यामुळे भाजपने आगामी आत्मपरिक्षण करत जातीपातीचे राजकारण सोडून द्यावे - भाजप सहयोगी खासदार संजय काकडे
Assembly Elections Results 2018: ज्या राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आहे. पंतप्रधन सुद्धा याच प्रदेशातून येतात. येथे आरएसएसचे (RSS) चांगले नेटवर्क आहे अशा राज्यात जर आम्हाला विजयासाठी संघर्ष करावा लागत असेल तर, ती भाजपसाठी धोक्याची घटना आहे. त्यामुळे भाजपने राम मंदिराचा (Ram Mandir) मुद्दा सोडावा आणि विकासाचा मार्ग धरावा. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा 2014ला दिलेल्या विकासाच्या मुळ घोषणेकडे परत यावे, असे मत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे (MP Sanjay Kakade) यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, मी हे विधान भाजपचा सहयोगी खासदार म्हणून करत नाही. तर, एक निरिक्षक म्हणून करतोय, असे सांगायलाही खा. काकडे विसरले नाहीत.
मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक खासदार हे भाजपचे आहेत. आमदारही भाजपचे आहेत. गेली काही वर्षे हा पक्ष राज्यात सातत्याने सत्तेवर आहे. त्यामुळे सर्व गोष्टी अनुकुल असतानाही मध्ये प्रदेशमध्ये भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागणे ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भाजपने आगामी आत्मपरिक्षण करत जातीपातीचे राजकारण सोडून द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये जो सबका सात सबका विकास ही घोषणा दिली होती. त्या घोषणेकडे पुन्हा एकदा पक्षाने जायला हवे, असे काकडे म्हणाले. (हेही वाचा, काँग्रेसमुख भारताचा नारा देणारेच मुक्त होतील: अशोक गेहलोत)
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये जरी भाजप विजयी झाला तरी, त्या विजयात जर 10 ते 15 जागांचे अंतर असेल तर, मी तो विजय मानत नाही. त्या ठिकाणी आमचा पराभव झाला असेच मानले जाईल, असेही काकडे म्हणाले. संजय काकडे हे भाजपचे सहयोगी खासदार आहे. ते मुळचे पुण्यचे असून भाजपच्या संपर्कात येण्यापूर्वी ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अत्यंत जवळचे मानले जात. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीवेळीही काकडे यांनी भाजपला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देत निकाला आधिच भाजपचे भविष्य वर्तवले होते. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी आपण हे पक्षाचे मत म्हणून नव्हे तर, आपण केलेल्या खासगी सर्व्हेच्या आधारे बोलत असून ते माझे व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, काकडे यांच्या वक्तव्याचे पडसाद भाजपमध्ये उमटण्याची शक्यता आहे.