Pankaja Munde यांच्या कार्यालया समोर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केल्याने 42 जणांवर गुन्हा केला दाखल
कोव्हिड नियमांचे उल्लघंन प्रकरणी पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडेच्या वरळी येथील कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अलिकडेच झालेल्या भाजप मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांची बहीण व खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला नाही. तेव्हा मुंडे परिवाराला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांचे समर्थक वरळी येथील कार्यालयात एकत्र आले होते.
प्रीतम मुंडे यांचे नाव डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या पदाचे राजीनामे देत होते. ही नाराजी दुर करण्यासाठी पंकजा मुंडेच्या वरळी कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. मोठ्या संख्येने मुंडे समर्थक कार्यालयाबाहेर जमले होते. याप्रकरणी सुमारे 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेना पद मिळाले नसल्याने 70 पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. भागवत कराडांना मंत्रीपद मिळाल्याने मुंडे समर्थकांनामध्ये नाराजीचा सूर पसरला होता. यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी ही बैठक बोलवली गेली होती. यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांच्याशी संवाद साधला. मात्र या बैठकीला जास्त कार्यकर्ते असल्याने यातील 42 जणांवर कलम 188,135,37(3), 269 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील सर्व कार्यकर्त्याना नोटीस देऊन नंतर सोडण्यात आले.
आपल्या समर्थकांना संबोधित करतांना भाजप राष्ट्रीय सचिव आणि माजी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर दबाव, डावपेच वापरल्याची बातमी फेटाळून लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हेच आपले नेते असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या पक्षातील माझा प्रवास कठीण आहे. तसाच तो पुढेही असेल. मात्र मी पक्ष सोडणार नाही. विचार न करता कोणताही निर्णय घ्यायचा नाही. डॉ. कराड हे माझ्यापेक्षा मोठे असल्याने त्यांच्या विरोधात बोलणे चुकीचेच. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावळी दिली. जरी यावेळी अपयश आले असेल तरी प्रयत्न करण्याचे सोडणार नाही. असे त्यांनी मत व्यक्त केले. यासर्व प्रकरणी पंकजा मुंडेनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.